राजकोटचे बनावटी खत, महाराष्ट्रात शेतकऱ्यांची फसवणूक उघड...
06-08-2024
राजकोटचे बनावटी खत, महाराष्ट्रात शेतकऱ्यांची फसवणूक उघड...
राजकोट (गुजरात) येथील खत निर्मिती कंपनीने बनावट खत महाराष्ट्रामधील शेतकर्यांच्या माथी मारून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खत उत्पादन करणारी कंपनी आणि कासेगाव येथील खत विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिवच्या कृषी अधीक्षक कार्यालयाने तामलवाडी (ता. तुळजापूर) मधील गोदाम सील केले आहे. तामलवाडी येथे एका गोदामात रासायनिक खताचा अनधिकृत साठा असल्याची माहिती अज्ञाताने धाराशिवच्या जिल्हा कृषी अधीक्षकांना दिली.
धाराशिवचे खत निरीक्षक तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या गोदामावर झडप घेतली. गोदामात गुजरातच्या कंपनीचे ४०० पोती (२० मे. टन) बनावट १०:२६:२६ रासायनिक खत आढळून आले.
या खताच्या साठ्याची कुठेही नोंद नव्हती. त्याबरोबर गोदाम (कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) येथील एका व्यक्तीच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. या खतांची बाजारभावाप्रमाणे ५ लाख ८८ हजार रुपये किंमत करण्यात आली आहे.
१५० रुपयांचे जिप्सम १४५० रुपयांना:
राजकोटच्या कंपनीने जिप्समच्या गोळ्या करून आकर्षक पॅकिंग करून. त्यावर एनपीके १०:२६:२६ छापून त्याची बाजारात विक्री केली. वास्तविक, त्यामधील जिप्समची किंमत १५० (५० कि. बॅग) असून, खर्चासहित दोनशे रुपये होऊ शकते.
मात्र, कंपनीने १४५० रुपये किंमत छापून त्याची विक्री जास्त किमतीमध्ये करीत असल्याचे स्पष्ट झाले.