मे महिन्यात करावयाची शेतीची कामे

02-05-2024

मे महिन्यात करावयाची शेतीची कामे

मे महिन्यात करावयाची शेतीची कामे

भुईमूग (उन्हाळी)

भुईमूग पीक काढणीयोग्य तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात, शेंगाचे टरफल टणक बनते व टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागल्यास पिकाची काढणीकरुन भुईमूगाच्या शेंगा चांगल्या वाळवून साठवणूक करावी.

बागायती कापूस

  • मे महिन्याच्या मध्यापर्यंत जमीन चांगली तापल्यानंतर 2 ते 3 वखराच्या आडव्या व उभ्या पाळ्या देवून ढेकळे फोडून शेत सपाट करून घ्यावे.
  • शेवटच्या वखर पाळी अगोदर हेक्टरी 10 ते 12 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे.
  • बीटी कपाशीसाठी पेरणीच्यावेळी हेक्टरी 25 किलो नत्र, 65 किलो स्फुरद, व 65 किलो पालाश द्यावे.
  • बिगर बीटी कपाशीसाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 20 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे.
  • बीटी कपाशीची लागवड 20 मे नंतर 90 सें. मी. x 90 सें. मी., किंवा 120 सें. मी. x 60 सें. मी. सर्‍या पाडून करावी.
  • बागायती बिगर बीटी कपाशीची लागवड सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यासाठी मार्चचा पहिला पंधरवाडा, अहमदनगर जिल्ह्यासाठी एप्रिलचा पहिला पंधरवाडा तर खानदेश, विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मे चा दुसरा पंधरवाडा या दरम्यान करावी.
  • पेरणीपूर्वी एका पिशवीतील बियाण्यास प्रत्येकी 25 ग्रॅम अझोटोवॅक्टर किंवा अझोस्पिरीलम आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच 5 ग्रॅम ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करून सर्‍या ओलावून पेरणी करावी.
  • बीटी कपाशीभोवती 5 टक्के बिगर बीटी कपाशीची (रफ्युजिया) लागवड करावी.
  • पेरणीनंतर उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलिन 30 ई. सी. क्रियाशील घटक 50 ते 80 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी.
  • शेतात मित्रकिडींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहुबाजूने तसेच कापसाच्या दर 10 ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावी.
  • लागवडीनंतर 8 ते 10 दिवसांनी नांग्या भरून घ्याव्यात.

ऊस

  • सिंचनाची सोय असल्यास सुरु ऊसाची मोठी बांधणी करुन घ्यावी.
  • सुरु ऊसासाठी मोठया बांधणीच्या वेळी 100 किलो नत्र (217 किलो युरिया), 55 किलो स्फुरद (344 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 55 किलो पालाश (92 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रती हेक्टरी द्यावे.
  • ऊसाला युरियाची मात्रा देताना निंबोळी पेडींची भुकटी एक किलो व सहा किलो युरिया असे प्रमाण ठेवावे. किंवा निमकोटेड युरिया वापरावा.
  • पूर्वहंगामी आणि आडसाली ऊस जोदार वाढीच्या अवस्थेत असून उन्हाळयात पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • खोडवा ऊसाला (खोडवा ठेवल्यानंतर 135 दिवसांनी) पहारीच्या सहाय्याने रासायनिक खतांचा दुसरा हप्ता म्हणजेच 125 किलो नत्र (272 किलो युरिया) 55 किलो स्फुरद (344 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 55 किलो पालाश (92 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी द्यावा.
  • काणी व गवताळ वाढीची बेटे समूळ काढून नष्ट करावीत.
  • ऊसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनाची सोय असल्यास 10 ते 20 आठवडयांपर्यंतच्या सुरू व खोडवा ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति आठवडा प्रति एकरी 6.5 किलो युरीया, 4.5 किलो मोनोअमोनिअम फॉस्फेट व 2 किलो पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावीत.
  • ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकर्‍यांनी ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा.
  • ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतुन पाणी द्यावे.
  • पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी. जेणे करून पाण्याचे बाष्पीभवन कमी होवून जमिनीत ओलावा टिकवून राहण्यास मदत होईल.
  • पिकास पाण्याचा ताण असल्यास लागणीनंतर 60, 120 आणि 180 दिवसांनी 2% म्युरेट ऑफ पोटॅश व 2% युरीया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
  • पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी 6 ते 8% केवोलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
  • ऊस पीक हे तण विरहीत ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होऊन ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
  • शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पीके लावावीत.
  • लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी 5 ते 6 टन पाचटाचे आच्छादन करून प्रती टन पाचटासाठी 8 किलो युरीया, 10 किलो सुपर फास्फेट व 1 किलो पाचट कुजविणार्‍या जिवाणूंचा वापर करावा.
  • हुणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपक्रम सामुदायिकरित्या करावा.
  • ऊसावर कांडी किडीचा प्रादुर्भाव असल्यास 5-6 ट्रायकोकार्डस प्रति हेक्टरी मोठया बांधनीनंतर दर दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी 1 महिन्यापर्यंत लावावी.
  • खवले किडीचा प्रादुर्भाव असल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 2600 मि.ली. प्रति 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • पांढर्‍या माशीच्या बंदोबस्तासाठी व्हर्टीसिलीयम लिकॅनी (फुले बगीसाईड) 1 ते 2 कि. ग्रॅ. प्रति हे. फवारावे.
  • ऊ स पिकास पायरिलाचा प्रादुर्भाव असल्यास इपिरिकॅनिया मेल्यॅनोल्युका या परोपजीवी मित्र किटकाचे 5000 जिवंत कोष अथवा 50000 अंडीपुंज प्रती हेक्टरी वापरावेत.

कडधान्य

मूग आणि उडिद

  • पेरणीपूर्वी खोल नांगरट करावी व कुळवच्या 2 पाळ्या दयाव्यात, काडीकचरा वेचून घ्यावा.
  • हेक्टरी 5 टन शेणखत

तूर

  • हेक्टरी 5 टन कंपोस्ट / शेणखत टाकावे.
  • पेरणीपूर्वी खोल नांगरट करावी व कुळवच्या 2-3 पाळ्या देऊन शेत पेरणीस तयार ठेवावे.

भात

  • पूर्वमशागत - भात पिकाच्या योग्य वाढीसाठी शेताची योग्य प्रकारे पूर्वमशागत करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि काही प्रमाणात तण, कीड व रोगांचेही नियंत्रण होते.
  • सेंद्रीय खतांचा वापर - नांगरणीच्या वेळी हेक्टरी 10 ते 12.5 मे.टन शेणखत अथवा कंपोस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून द्यावे.

नाचणी

  • जमिनीचा प्रकार - उथळ
  • जमिनीची खोली - 25-30 सें.मी.
  • जमिनीचा पोत - वाळूमय ते पोयटा मिश्रण
  • सामू - 6.0 ते 7.3, विद्युत वाहकता -  0.10 - 0.40 डेसिसायमन/ मिटर
  • शेतीची नांगरट करणे, कुळवणी करणे, शेतातील धसकटे वेचणे
  • जमिनीची मशागत -  पुर्वमशागत ः एक नांगरणी उतारास आडवी आणि दोन कुळवाच्या पाळ्या देणे. पेरणीपूर्वी मशागत करताना सेंद्रिय खताची मात्रा 5 टन/हेक्टरी मिसळावे.

रब्बी ज्वारी

  • पहिला पंधरवाडा - जमिनीची खोल नांगरट करावी.

बाजरी

  • खोल नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रति हेक्टरी 5 टन शेणखत शेतात मिसळावेत.

सोयाबीन

खोल नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रति हेक्टरी 5 टन शेणखत मिसळावे.

फळबाग व्यवस्थापन

  • डाळिंब - पाणी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे. जैवीक आच्छादन करावे.शक्यतो फुट काढणी करू नये. फळांना पेपरबॅग लावून संरक्षण करावे खोड किडीचे नियंत्रण करावे.
  • बोर - 15 मेदरम्यान छाटणी करावी.
  • आवळा - संरक्षित पाणी द्यावे.
  • अंजीर - संरक्षित पाणी द्यावे.
  • जांभूळ - संरक्षित पाणी द्यावे. खोडांना साल पोखरणारी अळी नियंत्रणासाठी गेरू व क्लोरोपारीफॉस पेस्ट लावावी.
  • कागदि लिंबू - उन्हाळ्यात 8-10 दिवसाचे अंतराने पाणी द्यावे. रोगट, किडग्रस्त व

भाजीपाला व्यवस्थापन

  • भेंडी व गवार पिकाची काढणी करावी.
  • वेलवर्गीय भाजीपाला काढणीचे काम वेळेवर करावे.
  • उन्हाळी, मिरची व वांगी पीक फुलोरा अवस्थेत उष्ण व जास्त तापमाणामुळे फुलगळ होण्याची शक्यता असते.
  • उन्हाळी मिरची व वांगी पिकामधील फुलगळीचे प्रमाण कमी करून फळधारणा वाढविण्यासाठी संजीवकाची व सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी तसेच पिकाचे उष्ण तापमानापासून संरक्षणासाठी सभोवताल व प्रत्येक चार ओळीनंतर मका पिकाची लागवड करावी.
  • टोमॅटो पिकाचे उन्हापासून संरक्षण करावे.
  • किड व रोगाचा प्रार्दुभाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी योग्य उपाय करावेत.

पशुसंवर्धन

  • मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक औषध पाजावे व शेवटच्या आठवडयात लाळखुरकत, फ-या व घटसर्प या रोगांच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचन घ्याव्यात.
  • उष्माघातामध्ये सर्व प्रथम जनावराला थंड ठिकाणी बांधावे. त्यानंतर थंड पाण्यात ओला केलेला तळवटाचा, पोत्याचा तुकडा जनावराच्या दोन्ही शिंगाच्या मध्ये बांधून तो सतत ओला राहिल याची दक्षता घ्यावी हलके पाचक गुळमिश्रीत खाद्य द्यावे. भरपुर थंड पाणी पिण्यास द्यावे तत्काळ पशुवैद्यकांना बोलावून त्यांचे सल्याणे जनावरांवर आवश्यक औषधोपचार करावा.
  • गोठयातील हवा खेळती राहिल याची दक्षता घ्यावी. तसेच गोठयात पंखे किंवा पाण्याचे फवारे उपलब्ध ठेवावे.

agricultre, agri, sheti, may, bhuimug, kapus, cotton, us, sugarcane, moog, udid, tur, bhat, nachani, jwari

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading