पूराने पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली...
27-07-2024
पूराने पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली...
जिल्ह्यातील पंचगंगेबरोबर सर्वच नद्यांना पूर आला असून नदी कार्य क्षेत्रातील ७२ गावांना त्याचा थेट फटका बसलेला आहे. जवळजवळ ६० हजार हेक्टर क्षेत्र पुरामध्ये व्यापले आहे. भात, सोयाबीन, ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यामधील पंचगंगा, कुंभी, कासारी, कडवी, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा इत्यादि नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी या नद्यांच्या परिसरात सर्वत्र पसरले आहे. नदी, ओढ्यांच्या पाण्याखाली पिके गेली आहेत.
ऊस, भात, सोयाबीन आठ दिवस पासून पाण्याखाली आहेत त्याबरोबरच पाण्याबरोबर येणारी माती, कचऱ्यामुळे पिकांचे नुकसान होते. पिकाच्या शेंड्यावर माती थांबली की पिके कुजायला सुरू होतात.
कशी होते पीक खराब होण्याची प्रक्रिया..?
ऊस:
सलग आठ दिवस उसाचा शेंडा पाण्याखाली राहिल्याने नुकसान जास्त होते. शेंड्यात माती, कचरा राहिल्याने उसाचे कांडे वरून खालपर्यंत वाळतात. प्रत्येक कांडीला फुटवा येऊन पोकळ होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते.
भात:
भात उंचीने कमी असल्याने थोडे जरी पाणी पात्राबाहेर पडले तर पीक पाण्याखाली जाते. चार-पाच दिवस सलग भात पाण्याखाली राहिले तर खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते.
सोयाबीन:
सोयाबीन पिकाला अधिक पाणी सहन होत नाही. दोन ते तीन दिवस पाण्याखाली राहिले की सोयाबीन पिकाची कुजण्यास सुरुवात होते.