विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादनात झाली वाढ; मागणीनुसार घरोघरी विक्री करून शेतकरी मिळवताहेत अधिकचा नफा
29-07-2024
विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादनात झाली वाढ; मागणीनुसार घरोघरी विक्री करून शेतकरी मिळवताहेत अधिकचा नफा
शेतातील मातीची सुपीकता टिकून राहिली तरच उत्पादनात भर पडणार आहे हा विषय लक्षात घेऊन वाशिम तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक शेतकर्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेणे सुरू केले आहे.
तसेच उत्पादित मालाची मागणीनुसार घरोघरी विक्री केली जात असून, त्यांना कृषी विभागाचे सहकार्य सुद्धा मिळतच आहे.
या विषयी माहिती देताना कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था 'ATMA'चे तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी सांगितले की, कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन मिळणे शक्य असल्याने अधिकांश शेतकर्यांचा कल आजही रासायनिक शेतीकडेच आहे.
जास्त उत्पादन मिळवण्यासाठी मशागतीपासून ते पीक काढण्यापर्यंत खत, कीटकनाशक, तणनाशक, इत्यादि घटकांचा उपयोग केला जात आहे.
त्यातून उत्पादनात भर पडत आहे. मात्र, पिकांतील रासायनिक घटकांचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. याशिवाय जमिनीचा पोतही बिघडत चालेला आहे.
त्यामुळे आरोग्य जपणारे नागरिक सेंद्रिय शेतीतून पिकविलेल्या अन्न धान्याला प्राधान्य देत असून, सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकर्यांना चांगला परतावा मिळत असल्याचे लव्हाळे यांनी स्पष्ट केले.
सेंद्रिय भाजीपाल्याचे फायदे:
- स्नायू शक्ती आणि ऊर्जा: अधिक पोषक तत्वे असल्यामुळे जैविक भाज्या खाल्ल्याने शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि स्नायू शक्ती वाढते.
- जास्त टिकाऊपणा: जैविक पद्धतीने उगवलेल्या भाज्या अधिक टिकाऊ असतात, ज्यामुळे त्या दीर्घकाळ ताज्या राहतात.
- पोषक तत्वे: जैविक भाज्यांमध्ये अधिक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे त्या अधिक पौष्टिक असतात.
- रासायनिक मुक्त: जैविक भाज्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापराशिवाय उगवलेल्या असल्याने त्या सुरक्षित असतात.
- चव आणि गंध: जैविक भाज्यांची चव आणि गंध अधिक चांगली असते.