कीटकनाशके खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी
19-09-2025

कीटकनाशके खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी
१. किटकनाशकांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?
किटकनाशके फवारताना सगळ्यात आधी त्यावर लिहीलेल्या गुणधर्मांची माहिती घेणं गरजेचं आहे.
किटकनाशकाच्या डब्यावर पतंगीच्या आकाराचे काही चिन्हं दिलेली असतात, ज्यावरुन त्याच्या जहालपणाचं प्रमाण मिळतं. यामध्ये लाल रंग अति विषारी, पिवळा रंग तीव्र विषारी, निळा रंग मध्यम विषारी व हिरवा रंग कमी विषारी असा क्रम लागतो.
किटकनाशकाचा उत्पादन दिनांक आणि वापरण्याचा कालावधी पाहून घ्यावा. कालावधी संपलेले किटकनाशके वापरु नये.
विद्यापीठाने शिफारस केलेल्या किटकनाशकाची खरेदी करावी.
२. योग्य किटकनाशकांची निवड
फवारणीपूर्वी किटकनाशकांची निवड करताना पिकावर कोणती कीड आहे किंवा रोग आहे याची सर्वेक्षणाद्वारे खातरजमा करावी.
पिकावर कीड किंवा रोगाचे निदान झाल्यास तज्ञांकडून याची पडताळणी करून घ्यावी व त्या किडी किंवा रोगासाठी शिफारसीत केलेल्या किटकनाशकाचा/ बुरशीनाशकाचा वापर करावा.
किटकनाशकांचे द्रावण तयार करणे.
बाजारामध्ये दोन प्रकारची किटकनाशके उपलब्ध असतात एक म्हणजे पाण्यामध्ये मिसळणारी (ईसी, एससी, डब्ल्युपी, डब्ल्यु एससी इ.) तर दुसरी म्हणजे पाण्यात विरघळणारी (एसपी, डब्ल्युएसएल, एसएल, एसजी इ.)
पहिल्या प्रकारची किटकनाशके पाण्यात मिसळतात परंतु विरघळत नाहीत त्यामुळे द्रावण करताना सतत ढवळावे.
दुसऱ्या प्रकारची किटकनाशके पाण्यात पूर्णपणे विरघळत असल्यामुळे ते किडीसाठी प्रभावी ठरतात व झाडांमध्ये त्वरित शोषली जातात.
प्रथमतः किटकनाशकाचे द्रावण तयार करून घ्यावे.
प्लॅस्टिक बकेट मध्ये पाणी घेऊन त्यात किटकनाशक मोजून टाकावे व काठीने ढवळून एकजीव द्रावण तयार करावे.
हे द्रावण १०० लिटर पाण्यासाठी तयार केले असल्यास ड्रममध्ये द्रावण टाकून पाण्याची पातळी १०० लिटर करावी व काठीने ढवळून एकजीव द्रावण तयार करावे.
प्रत्येकवेळी पंपामध्ये द्रावण भरताना ड्रममधील द्रावण काठीने ढवळत जावे.
३. योग्य फवारणी पंपाची निवड
पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात दोन ओळीमधील जमीन झाकलेली नसते, अशावेळी हातपंपाचा वापर करावा.
पिक मोठे झाल्यावर पॉवर पंपाचा उपयोग करू शकतो.
फवारणी पूर्वी फवारणी यंत्र दुरुस्तीची आवश्यकता असल्यास ते दुरुस्त करून घ्यावे.
प्रत्येक हंगामात किमान एकदा तरी फवारणीची सामुग्री पूर्णपणे ठिकठाक करून घ्यावी आणि ती कार्यक्षम असल्याबाबतची खात्री करावी.
नोझल योग्य आहे कि नाही तपासावे, नोझल सदोष / घासलेले असल्यास नवीन टाकावे.