मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू

13-04-2024

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्याच्या अनेक भागांना गारपिटीचा फटका बसला आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून शेकडो हेक्टर मका, ज्वारी, बाजरी आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे 2 हजार 716 हेक्टर पिकांवरील नुकसान झाले आहेत.  तर 777 हेक्‍टरवरील फळ पिकांचे झालं नुकसान झाले आहेत. 

अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे. मराठवाड्यात 84 जनावरांचा मृत्यू झाला असून 356 घरांचे नुकसान झाले आहे. गारपीटमुळे मराठवाड्यातील 201 गाव बाधित झाली असून, 4 हजार 301 शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसला आहे. 

मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात नुकसान

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये 163 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
  • जालनामध्ये 134 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
  • परभणी 50  हेक्टर पिकांचे नुकसान.
  • हिंगोली 297 हेक्टर पिकांचे नुकसान.
  • नांदेडमध्ये 749 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
  • बीडमध्ये सर्वाधिक 1021 हेक्टर पिकांचे नुकसान
  • लातूरमध्ये 50 हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे.
  • धारशिव जिल्ह्यात 308 हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा फटका बसला आहे.

लातूर जिल्ह्यात फळबागांचे मोठं नुकसान 

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, जिल्ह्यात 9 जनावरे दगावली असून, लातूर आणि जळकोट तालुक्यातील काही ठिकाणी फळबागांचे नुकसान झालंय. या दोन तालुक्यात मिळून जवळपास 25 एकर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची आकडेवारी प्रशासनाकडे तत्काळ येत आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले की, प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.

बीड जिल्ह्यात वीज पडून महिलेचा मृत्यू...

बीडच्या गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे वीज पडून एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, यामध्ये पंधरा वर्षाचा मुलगा गंभीररित्या भाजला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीना गणेश शिंदे असं या महिलेचे नाव असून, महिला आणि मुलगा दोघेजण शेतामध्ये काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामध्येच मीना शिंदे यांच्या अंगावर विज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्या बाजूला असलेला ओमकार शिंदे हा पंधरा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

परभणी दोघांचा मृत्यू, शेतीचे प्रचंड नुकसान 

परभणी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अविरत पाऊस पडत आहे. काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर 6 जनावरांचा देखील मृत्यू झालाय. तसेच अनेक ठिकाणी आंबा फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसानही झाले आहे. वीज पडून गंगाखेड तालुक्यातील ईळेगाव येथील 55 वर्षीय बाबुराव शेळके या शेतकऱ्याचा मृत्यु झाला. तर, सोबत असणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या आहेत. तसेच, सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा येथील हरिबाई सुरनर यांचाही वीज पडून मृत्यू झालाय. सोबतच आणखी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून 6 जनावरे दगावली आहेत. दुसरीकडे भाजीपाल्यांचे ही नुकसान झाले आहे. पुर्णा तालुक्यातील चुडावा, दस्तापुर आदी ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. माधव शिनगारे या शेतकऱ्यांने टमाट्यामध्ये आंतरपीक दोडका घेतलं होतं, वेलवर्गीय पिकाला नुकतीच फळधारणा सुरू झाली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने हा फड पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.

rain, weather forcast, heavy rain, unseasonal rain, weather

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading