लसणाच्या दरात उसळी, शेतकऱ्यांसाठी भरभराटीची संधी...
28-11-2024
लसणाच्या दरात उसळी, शेतकऱ्यांसाठी भरभराटीची संधी...
लसणाला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसत आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जळोची भाजी मार्केटमध्ये सध्या लसूण आणि इतर भाजीपाला चांगल्या किमतींनी विकला जात आहे.
लसणाला प्रति किलो उच्चांकी ₹280 दर मिळत असून सरासरी दर ₹220 प्रति किलो इतका आहे. यासोबतच शेवग्यालाही चांगली मागणी असून त्याचे कमाल दर ₹250 आणि सरासरी ₹200 प्रति किलो मिळत आहेत.
बाजारभाव वाढीमागचे कारण:
थंडीचा कडाका वाढल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. कमी आवक आणि वाढती मागणी यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
आधुनिक सुविधा शेतकऱ्यांसाठी:
बारामती बाजार समितीने जळोची भाजी मार्केटमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी अत्याधुनिक सेलहॉलची उभारणी केली आहे. या सुविधेमुळे शेतमालाला ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळते.
शेतमालाची गुणवत्ता टिकून राहते, त्याला कोणताही कट नाही किंवा नुकसान होत नाही. यामुळे बारामती आणि आसपासच्या तालुक्यांतून मोठ्या प्रमाणावर फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक होत आहे.
उघड लिलावामुळे व्यापाऱ्यांचा कल वाढला:
भाजी मार्केटमध्ये उघड लिलाव पद्धतीने खरेदी-विक्रीची व्यवस्था केल्यामुळे परराज्यातील खरेदीदार येथे येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री थेट बाजार आवारात करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
मागील वर्षीपेक्षा लसणाच्या दरांमध्ये मोठी वाढ:
मागील वर्षी प्रति १०० रुपये प्रति चार किलो या दराने लसूण मिळत होता. पण, लसणाच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा लागवड कमी केली. परिणामी, कमी आवक आणि मागणी अधिक असल्यामुळे यंदा लसणाच्या दरांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात लसूण सध्या ₹400 प्रति किलो या दराने विक्री होत आहे.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर संधी:
लसणासह शेवगा, वांगी, मिरची, भेंडी, वाटाणा, दोडका, गाजर, दुधी भोपळा, कारले आणि इतर फळभाज्या तसेच पालेभाज्यांना सध्या बाजारात चांगले दर मिळत आहेत. शेतकरी आपल्या मालाचे योग्य मूल्य मिळवण्यासाठी या बाजारात आपला माल विक्रीसाठी आणत आहेत.
ताजे लसूण बाजारभाव:
https://www.krushikranti.com/bajarbhav/lasun-bajar-bhav-today