हरभरा लागवडीसाठी योग्य वेळ आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंचसूत्री मार्गदर्शन...

28-10-2024

हरभरा लागवडीसाठी योग्य वेळ आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंचसूत्री मार्गदर्शन...

हरभरा लागवडीसाठी योग्य वेळ आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंचसूत्री मार्गदर्शन...

परिसरामधील सोयाबीन काढणी उरकत आली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या राशी केल्या असून, रब्बी हंगामातील हरभरा लागवडीसाठी लगबग सुरूवातच  झाली आहे. हरभरा पीक हे रोपावस्थेत असताना यावर मर व मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो.

हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करूनच हरभऱ्याची पेरणी करावी, असा सल्ला तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे. कृषी कार्यालयाकडून नुकतेच रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे तुरीला पाणी लागल्याने जळाले आहे.

पाझर तसेच साठवण तलाव ओव्हर फ्लो तर नदी, कालवे वाहत आहेत. विहीर व कूपनलिकेच्या पाणी पातळीतसुद्धा वाढ झाली आहे, परिणामी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हरभरा लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.

हरभरा पिकामधील मर रोग फ्युजारीय ऑक्सझिस्पोरम या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव होताच झाडाची पाने पिवळी पडून कोमेजतात. झाडाची शेंडे मलूल होऊन हिरव्या अवस्थेतील झाड वाळते. रोप उपटून पाहिले असता मुळे सडलेली दिसतात व सहज उपटली जातात.

हरभरा पीक रोपावस्थेत असताना मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे हरभरा पीक पेरणीपूर्वी बीज प्रक्रियेची उपाययोजना करणे गरजेचे आहे, असा सल्ला तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आला आहे. कृषीकडून गावोगावी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे.

पंचसूत्रीचा अवलंब करावा :

  • हरभरा हे रब्बी हंगामातील व्यवस्थापनास प्रतिसाद देणारे असे कडधान्याचे पीक असून, भरघोस उत्पादनाबरोबरच चांगला बाजारभाव मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या हे अतिशय फायदेशीर, असे हे पीक आहे.
  • हरभऱ्यासाठी पीक व्यवस्थापन करताना योग्य वेळ, बीज प्रक्रिया, सुधारित जातींचा वापर, सुधारित लागवड, आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर आणि पीक पोषण व दाण्याचे वजन वाढीसाठी अन्नद्रव्यांची फवारणी या पंचसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक असते, असे तालुका कृषी अधिकारी शिवचंद्रपाल जाधव यांनी सांगितले.

हरभरा लागवड केव्हा करावी :

  • २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान हरभरा लागवडीची योग्य वेळ आहे. या कालावधीनंतर नोव्हेंबर महिन्यात पेरणी केल्यास प्रत्येक आठवड्यात १ क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन घटते, तसेच डिसेंबर महिन्यातील पेरणीमुळे उशीर झालेल्या प्रत्येक आठवड्यात हेक्टरी २ क्विंटल उत्पादन कमी मिळते.
  • त्याचप्रमाणे २५ ऑक्टोबरच्या पूर्वीही हरभरा पेरणीची घाई केल्यास अगोदरच्या प्रत्येक आठवड्यामागे हेक्टरी २ क्विंटल उत्पादन घटते, असे मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले.

सोयाबीन काढणी, हरभरा लागवड, बीज प्रक्रिया, मर रोग, मूळकुज, रब्बी हंगाम, तलाव, पाणीसाठा वाढ, कृषी सल्ला, पंचसूत्री, हरभरा उत्पादन, सिंचन पद्धती, बियाणे फवारणी, शेतकरी, shetkari, biyane, rabbi, harbara, rog niyantran, mar, mulkuj

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading