हरभरा भावात क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता

25-12-2023

हरभरा भावात क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता

हरभरा भावात क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात नाताळ सणांच्या सुट्ट्यांमुळे वायदे बंद आहेत. त्यामुळे वायद्यांमध्ये शुक्रवारच्याच दराची माहिती उपलब्ध आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभुमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नमरमाई पाहायला मिळाली. त्याचा परिणाम देशातील बाजारावर दिसून आला होता.

पण कालपासून देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात प्रक्रिया प्लांट्सनी १०० रुपयांची सुधारणा केली होती. बाजार समित्यांमध्ये मात्र सोयाबीनचा भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनच्या भावात नव्या वर्षात काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाचे वायदेही आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारात बंद होते. कापसाचे भाव यंदा सुरुवातीपासूनच दबावात आहेत. त्यातच डिसेंबर महिन्यात बाजारातील कापूस आवक वाढली आहे. कापसाची आवक सरासरी १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान होत आहे. याचाही दबाव दरावर आहे.

आजही कापसाला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक आणखी महिनाभार जास्त राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सरकारने पिवळा वाटाणा आयातीला शुल्कमुक्त परवानगी दिल्याने हरभरा भावात एक हजार रुपयांपर्यंत नरमाई आली होती. सध्या हरभरा ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकाला जातोय. पण रब्बी हंगामातील हरभरा लागवड अजूनही साडेनऊ टक्क्याने पिछाडीवर आहे. तसेच हरभरा उत्पादकताही कमीच राहण्याचा अंदाज आहे.

बदलत्या वातावरणाचा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. त्यातच प्रक्रियादारांकडून सध्याच्या भावात उठाव मिळतोय. तर नाफेडची विक्री मर्यादीत सुरु आहे. त्यामुळे हरभरा भावाला आधार मिळतोय. हरभरा भावात क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे.

हळदीने चालू वर्षात मध्यापासून चांगलाच भाव खाल्ला. बाजारातील टंचाई, वाढती निर्यात, लागवडीतील अनिश्चितता, यामुळे हळदीचे भाव तेजीत आले होते. आता हळदीचे भाव काहीसे कमी नरमले आहेत. सध्या हळदीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार १५ हजारांचा भाव मिळत आहे.

पण यंदा घटलेली लागवड, प्रतिकूल हवामान आणि पाण्याचा ताण यामुळे हळदीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवा माल बाजारात सुरु होत आहे. त्यामुळे भाव नरमले आहेत. पण २०२४ मध्येही हळद भाव खाण्याची शक्यता असल्याचे बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली.

कांद्याचा भाव मागील तीन दिवसांमध्ये पुन्हा १०० रुपयांनी कमी झाला. निर्यातबंदी आणि बाजारातील वाढती आवक यामुळे कांद्याचे भाव नरमले आहेत. सध्या राज्यातील बाजारात कांद्याचे व्यवहार १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होत आहेत.

पुढील महिन्यात गुजरात आणि इतर भागातील कांदाही दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे भावावरील दबाव आणखी काही दिवस राहू शकतो. निर्यातबंदीनंतर कांदा भावात तब्बल २ हजार ५०० रुपयांची घट झाली. यामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.

🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇

https://chat.whatsapp.com/KhCCLMztU3Q3b9HurYDRkd

gram price, harbhara bajarbhav

शेअर करा

इतर शेती विषयक माहिती

Loading