असं करा हरभऱ्यावरील घाटेअळीचं नियंत्रण!
06-09-2022
असं करा हरभऱ्यावरील घाटेअळीचं नियंत्रण!
रब्बी हंगामातील हरभरा या महत्वाच्या पिकांवर प्रामुख्याने घाटेअळी ही प्रमुख नुकसानकारक किड आहे. एक अळी साधारणतः ३० ते ४० घाटयांचे नुकसान करते या किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणे गरजेचे आहे . घाटेअळीमुळे ३० ते ४० टक्के हरभरा पिकाच नुकसान होते.
ओळख:-
पुर्ण विकसित घाटेअळी पोपटी रंगाची यावर विविध रंगछटा आढळुन येतात व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.
अवस्था: –
अंडी , अळी , कोष आणि पतंग अशा चार अवस्था या घाटे अळीच्या आढळुन येतात.
नुकसानीचा प्रकार:-
यामध्ये मादी पतंग कोवळ्या पानावर १५० ते ३०० अंडी घालते . ६ ते ७ दिवसात त्यातुन अळया बाहेर पडतात ही अळी गडद , करड्या तपकिरी हिरव्या रंगाची असते . अळी झाडांच्या भोवती ५ ते १० से.मी. कोषावस्थेत जाते व १५ दिवसांनी त्यातुन पतंग बाहेर येतो . या सर्व अवस्था ३५ ते ४० दिवसात पुर्ण होतात . नुकसान टाळण्यासाठी किडीच्या प्राथमिक अवस्थेत उपाय करने गरजेचे असते . प्रति एक मिटर अंतरावर १ अळी आढळल्यास नुकसान अधिक असते . सुरुवातीच्या अवस्थेत अळया पानावरील आवरण खरवडून खाते अशी पाने काहीशी जाळीदार व त्यावर पांढरे डाग दिसून येतात त्यानंतर अळया फुल व घाटे खायला लागतात . या काळात घाटयावर गोलाकार छिद्र दिसून येते . पुर्ण वाढ झालेली अळी तोंडाकडील भाग घाटयात घालून आतील दाणे फरत करते.
घाटेअळीचं नुकसान टाळण्यासाठी करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे
१. घाटेअळीचं एकात्मिक नियंत्रण करणे गरजेचे असते
२. त्यासाठी या आधीच्या हंगामातील पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव असेल त्याजागी हरभ – याची लागवड करू नये .
३. ज्या ठिकाणी ज्वारी , बाजरी , भुईमुगाची लागवड केलेली तेथेच हरभरा पिकाची पेरणी करावी .
४. पेरणी करण्याआधी जमिनीची नांगरणी करून कुळवाच्या २ ते ३ पाळया दयाव्यात यामुळे घाटेअळीचे कोष जमिनीत येतात आणि उष्णतेने त्यांचा नाश होतो .
५. शिफारशीत आणि रोगप्रतिकारक्षम वाण पेरणीसाठी निवडावे व जातीनिहाय अंतरावर लागवड करावी .
६. पिकांमध्ये एकरी १० ते २० या प्रमाणात पक्षी यांबे लावावेत व पक्षांना अकर्षित करण्यासाठी शेतात २०० ग्रॅम ज्वारीची पेरणी करावी .
७. हरभ – याचे पिक १ महिण्याचं होईपर्यंत त्यात खुरपणी , कोळपणी करून पिक तणमुक्त करावे .
८. साधारणत : ६ फुटाच्या बांबुवर पिकांपासून २ फुटाच्या उंचीवर एकरी २ कामगंधे सापळे लावावेत .
९ . फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत अळया आढळुन आल्यास त्या रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून नष्ट कराव्यात .
१०. हरभरा पिकात सापळा पिक म्हणून झेंडु या पिकांची एक ओळ लावावी.
११. घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एच . ए . एन . पि . व्ही . विषाणूची ५०० मिली प्रति हेक्टरी फवारणी करावी किंवा अळीचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडीरॅक्टीन ( ३०० पी.पी.एम. ) ५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी .
१२. रासायनिक नियंत्रण:-
नुकसान पातळीपेक्षा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पुढील प्रमाणे किटकनाशकाची फवारणी करावी .
● क्विनॉलफॉस ( २५ टक्के ई.सी. ) २ मिली प्रतिलिटर पाणी
• इमामेक्टीन बेझोएट ( ५ टक्के एस . जी . ) ०.४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा
• लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ( ५ टक्के ई.सी. ) १.६ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे किटनाशकाची फवारणी करावी
प्रा संजय बाबासाहेब बड़े
सहाय्यक प्राध्यापक ( कृषि विद्या ) दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगांव
ता . वैजापूर जि . औरंगाबाद . मो . नं . ७८८८२ ९ ७८५ ९