आज दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, काही भागात ऑरेंज अलर्ट…
26-06-2024
आज दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, काही भागात ऑरेंज अलर्ट…
मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारल्याचे दिसत आहे. पावसात पडलेल्या खंडामुळे डोळे आकाशाकडे लागले आहे.
अरबी समुद्रावरून मॉन्सून बळकट होत असल्यामुळे आज (ता. २६) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिसून आला आहे, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे.
मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकणात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका तर जोरदार पाऊस पडला. बाकीच्या राज्यामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान अरबी समुद्रातून मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह बळकट होऊ लागल्याने किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर बाष्प जमा झाले आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. तर राज्यामध्ये मात्र पावसासाठी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
मध्य गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्या पासून बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. मध्य प्रदेशावर चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानामध्ये घट झाली असली, तरी हि उन्हाचा चटका आणि उकाडा मात्र कायमच आहे.
मॉन्सूनची उत्तरेकडे वाटचाल:
महाराष्ट्र व्यापल्यानंतर मॉन्सूनने उत्तरेकडे वाटचाल केली आहे. मंगळवारी (ता. २५) उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, पश्चिम उत्तर प्रदेशाचा तसेच राजस्थानच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तरेकडील आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान निर्माण होत आहे.
जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
जोरदार पावसाचा येलो अलर्ट :
ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.