कोकणासह विदर्भावर निसर्ग कोपला? मुसळधार पावसामुळे गडचिरोली, नागपुरसह रायगडमध्ये शाळांना सुट्टी
22-07-2024
Rain Update : कोकणासह विदर्भावर निसर्ग कोपला? मुसळधार पावसामुळे गडचिरोली, नागपुरसह रायगडमध्ये शाळांना सुट्टी
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून पावसामुळे गडचिरोली, नागपुरसह रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक नद्यांनी इशारा पातळी
ओलांडली आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. तर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पुराचे पाणी अनेक गावांमध्ये आणि शहरी भागांमध्ये गेल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आले असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलास (SDRF) अलर्टमोडवर ठेवण्यात आले आहे. तर सोमवारी (ता. २२) हवामानशास्त्र विभागाकडून विविध जिल्ह्यांना मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आल्याने अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड, चंद्रपुर, भंडारा, नागपुर, आणि गडचिरोलीमध्ये सोमवारी शाळा बंद राहतील. याशिवाय, कोल्हापुरमध्ये देखील शाळांना सुट्टी देण्यात आली असून शिवाजी विद्यापीठाने पेपर पुढे ढकलले आहेत.
कोकणात पूरस्थिती
कोकणातील अनेक भागांना पावसाने झोडपले असून, पुढील चार दिवस कोकणच्या अनेक भागांत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याचदरम्यान गेल्या चार दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता हवामान विभागाकडून पुढील तीन तासांसाठी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
एनडीआरएफची टीम रायगडमध्ये
सततच्या पावसामुळे कोकणातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे, तर काही नद्या या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने एनडीआरएफची टीम रायगड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तैनात केली आहे. त्याशिवाय अनेक बचाव पथकांना देखील सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कुंडलिका नदीला पूर
शुक्रवार पहाटेपासून कोकणासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचदरम्यान रोहा येथील कुंडलिका नदी देखील इशारा पातळीच्या बाहेर गेली असून नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
अर्जुना नदीला पूर
रत्नागिरी जिल्ह्यातील अर्जुना नदीला पूर आला असून छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. याचदरम्यान अर्जुना धरणाचे पाणी नदी पात्रात सोडले जात असल्याने काही वाड्या वास्त्यांसह गावांपासून संपर्क तुटला आहे. त्यामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. शिवाय असळज ते साळवण दरम्यान खोकुर्ले येथे पाणी आल्याने गगनबावडा कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
जगबुडी नदी धोक्याची पातळी बाहेर
दरम्यान सलग पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच खेड दापोली मार्गावरील नारंगी नदीला देखील पूर आला असून खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तर सध्या जगबुडी नदी धोक्याची पातळी बाहेर गेल्याने खेड शहरावर पुराचा धोका आहे. सध्या प्रशासनाचे पूरस्थितीकडे लक्ष असून नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्यात.
वाशिष्ठी नदीला पूराचा अंदाज
चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला देखील पूर येण्याची शक्यता असून सध्या वाशिष्टी आणि शिव नदी इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मात्र मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या भरतीमुळे चिपळूण शहरात वाशिष्टीचे पाणी शिरले आहे.
नागपूर आणि गडचिरोली
नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर कायम असून गडचिरोलीत मागील तीन दिवसापासून पावसाची संततधारा सुरू आहेत. तर रविवार पासून नागपूरमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून महामार्ग देखील बंद करण्यात आली आहेत. दरम्यान गोसीखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व ३३ गेट एक मीटर पर्यंत उघडण्यात आले आहे. मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरणमधून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.
शाळांना सुट्टी
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून पावसाचा कहर सुरू आहे. सध्या सुरू असणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. तर पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे आपात्कालीन परिस्थिती निर्माण परिस्थिती बिघडू नये म्हणून संबंधीत जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली आहे. तर भंडाऱ्यात जिल्ह्यासह गडचिरोली, रायगड, कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.