कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपये मदत…
04-07-2024
कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपये मदत…
राज्य सरकार कापसाला योग्य भाव मिळाला नसल्याने हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देणार. जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत देईल, या निर्णयाची अंमलबजावणी लवकर केली जाईल, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले, सोयाबीन उत्पादकांनाही मदत जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.
कापूस हा विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख पीक आहे. कपाशी ला येणारा एकरी उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न याबाबत तफावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कापूस उत्पादक शेतकर्यांना येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यातील तफावत कमी करून शेतकर्यांच्या हिताचे धोरण ठरविण्यात येईल, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
कापसाच्या दरा विषयी सदस्य हरीश पिंपळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार, सदस्य प्रकाश सोळंके, यशोमती ठाकूर, नारायण कुचे, राजेश एकडे, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ बागडे, दीपक चव्हाण, राजेश पवार यांनी काही उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री श्री. सत्तार म्हणाले, मागील हंगामात मध्यम धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल ६ हजार ६२० रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रूपये प्रति क्विंटल असा दर दिला होता. सन २०२४-२५ मध्ये मध्यम धाग्याची कापूस खरेदी ७ हजार १२५ आणि लांब धाग्याचा कापसाची खरेदी प्रतिक्विंटल ७ हजार ५२१ ने करण्यात येणार आहे.
सोयाबीनचे दर कमी असल्यामुळे संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना सुद्धा मदत करण्यात येईल. कापूस पिकाला नुकसान भरपाईसाठी शासन हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत देणार असून, याबाबतची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येत आहे.
मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, राज्यात मागील हंगामात ११० केंद्रा मार्फत सी.सी.आय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) १२ लाख क्विंटल, खासगी बाजारात ३ लाख १६ हजार ९५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. स्वामिनाथन समितीने केलेल्या शिफारशीनुसार कापसाला भाववाढ मिळण्यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे.
सी.सी.आय कापूस खरेदीसाठी ई-पीक पाहणीमध्ये कापूस लागवडीची नोंद नसल्यामुळे अडचण निर्माण होते. या विषयी गाव पातळीवर कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्राम सेवक यांची समिती स्थापन करण्यात आली असून ई- पीक पाहणीमध्ये नोंदणी न केलेल्या शेतकर्यांची नोंदणी समिती करणार आहे. त्यामुळे सी.सी.आय च्या कापूस खरेदीला अडचण येणार नाही.
राज्यात बी ७, बी ८ कापूस बियाणे उपलब्धतेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तेलंगणा राज्यात कापूस पिकासाठी देण्यात येत असलेल्या अनुदान योजनेबाबत सर्वंकष माहिती घेण्यात येईल. कापूस खरेदीसाठी या हंगामात सीसीआयची खरेदी केंद्र वेळेत सुरू होण्यासाठी दक्षता घेण्यात येईल.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात खासगी व्यापार्याने कापूस खरेदी करून पैसे न देता शेतकर्यांची फसवणूक केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतकर्यांचे पैसे मिळण्या संदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
कापसाच्या भाव वाढी सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कापूस जास्त पिकतो, अशा परिसरातील बाजारपेठेत हमी भाव आणि या भावातच खरेदी करण्याबाबत ठळक अक्षरातील माहिती फलक लावण्यात येतील, असेही मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.