सध्या हळद बाजारातील आवक कशी सुरु आहे?
15-12-2023
सध्या हळद बाजारातील आवक कशी सुरु आहे?
नवी हळद पुढील महिन्याच्या मध्यापासून सुरु होईल. त्यामुळे दरवाढीला आधार मिळत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील चढ उतार कायम आहेत. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १३.१० डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होते. तर सोयापेंडचे वायदे ४०५ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीन भावावरील दबाव कायम होता.
सोयाबीनची बाजारातील आवक सरासरीएवढी असल्याचे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांनी सांगितले. बाजारात सोयाबीनला आज प्रतिक्विंटल ४ हजार ६०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर भाव घटल्याने अनेक शेतकरी सोयाबीन विकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात विक्री थांबवल्याचे दिसते.
देशातील बाजारात कापूस दरावरील दबाव कायम आहे. कापसाची भावपातळी आजही ७ हजारांच्या दरम्यानच होती. तर बाजारतील कापूस आवक सरासरी सव्वालाख गाठींच्या दरम्यान होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. देशातील बाजारात कापसाला आजही ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
कापसाचे वायदे १८० रुपयांनी वाढून ५६ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान पोचले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे काहीसे वाढून ८१.८२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. सध्या कापसाला अपेक्षेप्रमाणे उठाव नाही. तसेच निर्यातही कमीच असल्याचे उद्योगांनी सांगितले. त्यामुळे कापसाची ही भावपातळी आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
हळदीच्या बाजारावर सध्या हवामानातील बदलाचाही परिणाम दिसून येत आहे. प्रतिकूल हवामानामुळे हळदीच्या उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हळद उत्पादक पट्ट्यात नुकत्याच झालेल्या पावसाचा फायदा पिकाला होऊ शकतो.
पण लागवडच कमी असल्याने उत्पादनात फार मोठ्या वाढ होणार नाही. त्यातच सध्या हळदीची बाजारातील आवक कमीच आहे. याचा आधार हळद बाजाराला मिळत आहे. हळदीला सध्या बाजारात ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. नवी हळद पुढील महिन्याच्या मध्यापासून सुरु होईल. त्यामुळे दरवाढीला आधार मिळत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.
जिरा उत्पादक महत्वाच्या गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये जिरा लागवडीत मोठी वाढ झाली. गुजरातमध्येच जिरा लागवड तब्बल ९४ टक्क्यांनी वाढली. आतापर्यंत ४ लाक ३४ हजार हेक्टरवर जिरा लागवड झाली. तर राजस्थानमध्येही १३ टक्क्यांनी जिरा लागवड वाढली. लागवड वाढीचा परिणाम भावावर झाला.
जिऱ्याचा भाव मागील महिनाभरातच जवळपास १५ हजार रुपयांनी कमी झाला. सध्या जिऱ्याचे वायदे ३८ ते ३९ हजार रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ३५ हजार ते ३८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. जिऱ्याच्या भावावरील हा दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
बाजारात ज्वारीची टंचाई निर्माण होऊन भावात चांगलीच सुधारणा झाली. ज्वारीला सध्या चांगला उठाव आहे. त्यातच खरिपातील ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याचे व्यापारी सांगतात. सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे ज्वारीला सध्या गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजारांचा भाव मिळत आहे.
रब्बीतील ज्वारीचा पेरा काहीसा चांगला आहे. पण पुढील काळात बदलत्या वातावरणाचा फटका पिकाला बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्वारीचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत.
🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇
https://chat.whatsapp.com/KhCCLMztU3Q3b9HurYDRkd
source : agrowon