कपाशी वरील मर व्यवस्थापन
30-07-2024
कपाशी वरील मर व्यवस्थापन
बहुतांश ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत. या घटनेला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते.
या परिस्तितीत सिंचन दिल्यास किंवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते व कालांतराने झाडाची पाने गळून पडतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांमध्ये मर ची लक्षणे दिसू लागतात.
सुकल्यांनंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनातही मोठे नुकसान होऊ शकते.
मर व्यवस्थापन व उपाययोजना:
- अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.
- वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
- लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया + १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार मिश्रणाची प्रति झाड १०० मिली अशा प्रमाणे आळवणी करावी
- किंवा १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार झालेल्या मिश्रणाचे प्रति झाड १०० मिली मिश्रण द्यावे.
- वरील प्रमाणे मिश्रणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.
- वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळने शक्य येईल.