महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५२१६ कोटींचा प्रोत्साहनपर लाभ वितरीत…
10-08-2024
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५२१६ कोटींचा प्रोत्साहनपर लाभ वितरीत…
सहकार विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५२१६ कोटी ७५ लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे.
पण, या योजनेत पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५६ कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बँकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक २९ जुलै २०२२ रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली.
सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये ५० हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे.
पात्र असलेल्या १५ लाख ४४ हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी १५ लाख १६ हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यांमधून १४ लाख ४० हजार कर्जखात्यांसाठी ५,२२२ कोटी ५ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली.
यापैकी १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५,२१६ कोटी ७५ लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.