मनरेगा योजनेत सिंचन विहिरीसाठी अनुदान वाढ…
02-09-2024
मनरेगा योजनेत सिंचन विहिरीसाठी अनुदान वाढ…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिरीचे अनुदान ४ लाखांवरून पाच लाख रुपयां पर्यन्त करण्यात आले आहे. महागाईच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विहीर खोदकाम आणि बांधकाम करताना दिलासा मिळणार आहे.
केंद्र शासनाने १ एप्रिल २०२४ पासून मनरेगाच्या अंतर्गत दिवसाची मजुरी २९७ रुपये एवढी केली आहे. मजुरी दराच्या ४० टक्के इतका कुशल खर्च हा जवळपास १९८ रुपये एवढा मिळणार आहे. अकुशल व कुलश मिळून जवळपास ५०० रुपये प्रतिमनुष्य दिवस रक्कम मंजूर करता येऊ शकते.
या बाबी लक्षात घेता. ९०० मनुष्य दिवसासाठी ४ लाख ५० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विहीर कामांमध्ये पाणी उपसणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी जवळपास ५० हजार रुपये एवढी तरतूद करण्यात येते.
बांधकाम विभागाच्या चालू दर सूचीनुसार व केंद्र शासनाच्या वाढीव मजुरी दर विचारात घेऊन सिंचन विहिरीची अनुदान मर्यादा ५ लाख करण्यात आली आहे. यापूर्वी सिंचन विहिरीचे अनुदान ३ लाख होते.
त्यामध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये वाढ करून ४ लाख करण्यात आले. यंदा पुन्हा अनुदान वाढविण्यात आले आहे. ते १ एप्रिल २०२४ पासून असेल, त्यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत.
राज्यात तीन वर्षांत २९,४९० विहिरींचे कामे पूर्ण:
राज्यात प्रत्येक शेतकरी कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रियेची अंमलबजावणी केली जात आहे.
२०२१-२२ ते जून २०२४ या दरम्यान तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यात २९ हजार ४९० सिंचन विहिरींचे कामे पूर्ण झालेली आहेत.
दीड लाख विहिरींची कामे प्रगतीपथावर:
- राज्यात आजमितीस १ लाख ५५ हजार १६४ विहिरींची कामे सुरू आहेत.
- अलीकडे सिंचन विहिरींच्या कामांना मोठ्या प्रमाणात प्रशासकीय मान्यता दिली जात आहे. त्यामुळे सिंचन विहिरींची कामे वाढली आहेत.