वाशी बाजार समितीत कोकण हापूसची आवक वाढली त्यामुळे दरात एक ते दीड हजार रुपयांची घसरण
22-03-2024
वाशी बाजार समितीत कोकण हापूसची आवक वाढली त्यामुळे दरात एक ते दीड हजार रुपयांची घसरण
वाशी बाजार समितीत कोकण हापूसची आवक 31 हजार पेट्यापर्यंत पोहोचली आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचा दर पेटीमागे एक ते दीड हजार रुपयांनी कमी झाली आहे.
दर कमी होण्याला लाल समुद्रामध्ये हुती दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यांमुळे तसेच युरोपकडील रखडलेल्या निर्यातीचेही कारण पुढे येत आहे.
हवाई वाहतुकीवर समुद्रमार्गे होणाऱ्या निर्यातीच्या वाढत्या ओझ्यामुळे मागणी असूनही युरोप, अमेरिकेत आंब्याची निर्यात केली जात नाही. तज्ज्ञ आणि व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की किंमती वाढण्याचे कारण म्हणजे माल बाजारात टिकून आहेत.
हापूसचा हंगाम यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झाला. कोकणातून दिवसाला पाचशेपेक्षा अधिक पेट्या वाशी बाजारात पाठविण्यात येत होत्या. यंदा हापूसचे वारेमाप पीक येईल, असा अंदाज होता. मात्र थ्रिप्सचा प्रादुर्भाव आणि जानेवारीत पडलेल्या पावसाने हापूसला फटका बसला. मोहर गळून गेल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.अनियमित थंडीमुळे दुबार मोहराचे संकट बागायतदारांपुढे आहे. आंब्याची काढणी जोरात सुरू असताना, बागायतदार शेवटचा कण वाचवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. पहिल्या टप्प्यातील बहार आता उतरला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
सुरुवातीला बाजारात पेटीचा दर साडेसहा हजार रुपयांपर्यंत होता. हा दर पहिल्या पंधरवड्यात स्थिर होता. पण त्यानंतर परराज्यातील आंब्याची आवक वाढू लागल्यामुळे हापूसच्या दरावर परिणाम होऊ लागला. मार्चच्या सुरुवातीला उन्हाच्या कडाक्यामुळे तयार झालेला आंबा काढणीसाठी बागायतदार सरसावले. शनिवारी (ता. १६) वाशी बाजारात ३९ हजार पेटया दाखल झाल्या. त्यातील ३१ हजार पेट्या हापूसच्या असून उर्वरित ८ हजार पेट्या अन्य राज्यांतील आहेत.
वाशी बाजारावर हापूसचे दर अवलंबून असतात. गेल्या चार दिवसांपासून हापुसच्या एका पेटीची किंमत 2000 ते 4500 रुपये आहे. उत्पादन वाढल्याने दर घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच लाल समुद्रात हुती दहशतवादी संघटनांनी मालवाहू जहाजांवर हल्ले केल्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्याचा परिणाम समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीवर झाला आहे.
अनेक कंपन्यांनी सुएझ कालव्याचा मार्ग टाळत केप ऑफ गुड होपचा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. अनेक कंपन्यांनी युरोप, अमेरिका, आखाती देशांमध्ये मालवाहतूक करण्यासाठी हवाई मार्ग स्वीकारला आहे. यामुळे विमान कंपन्यांवरील ओझे वाढले आहे आणि हापूसच्या निर्यातीत अडथळा निर्माण झाला आहे.
वाशी येथील व्यापाऱ्यांनी सांगितले की, निर्यात होणारा माल स्थानिक बाजारपेठेत राहिल्याने किंमती कमी होण्याचे मुख्य कारण आहे. वाशीतील हापूसचे दर सुमारे १ ते दीड हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. जरी वाशीमध्ये दर खाली आले असले तरी वैयक्तिक आंबा विक्रेत्यांना चांगले दर मिळत आहेत.