किण्वित सेंद्रिय खत (FOM): शेतकऱ्यांसाठी वरदान
07-10-2024
किण्वित सेंद्रिय खत (FOM): शेतकऱ्यांसाठी वरदान
शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. सेंद्रिय खतांचा वापर कमी झाल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटले, पिकांची गुणवत्ता कमी झाली, आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या समस्येवर तोडगा म्हणून किण्वित सेंद्रिय खत (FOM) शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
किण्वित सेंद्रिय खत म्हणजे काय?
किण्वित सेंद्रिय खत हे वनस्पती किंवा प्राण्यांच्या अवशेषांपासून तयार होते. हे अवशेष anaerobic पद्धतीने कुजवून आंबविले जातात. आंबवण्यासाठी ईस्ट, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, आणि इतर ८० प्रकारचे सूक्ष्मजीव वापरले जातात. या प्रक्रियेमुळे तयार झालेले खत जमिनीतील पोषणतत्त्वे वाढवून पिकांना सर्वोत्तम अन्नद्रव्ये उपलब्ध करून देते.
किण्वित सेंद्रिय खताचे फायदे
- पाणी धारण क्षमता वाढवते: जमिनीची पाणी धारण क्षमता सुधारते, ज्यामुळे जमिनीत अधिक ओलावा राहतो.
- सच्छिद्रता सुधारते: मातीच्या सच्छिद्रतेत वाढ होते, ज्यामुळे हवा आणि पाण्याचा प्रवाह चांगला होतो.
- सूक्ष्मजीवांचा वाढलेला वापर: जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते, हे जिवाणू जमिनीतील अन्नद्रव्यांचे खनिजात रूपांतर करून पिकांना पोषक बनवतात.
- सेंद्रिय पदार्थांचे विघटन: जमिनीतील सेंद्रिय पदार्थ विघटित होतात आणि पिकांसाठी आवश्यक तत्त्वे तयार होतात.
- रासायनिक खतांचा वापर कमी: किण्वित सेंद्रिय खतामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करता येतो.
- पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा: पिकांची गुणवत्ता व चव सुधारते.
- पर्यावरण पूरक: किण्वन प्रक्रियेमध्ये मिथेन आणि कार्बन डाय-ऑक्साईड सारख्या ग्रीनहाऊस गॅसचे उत्पादन कमी होते.
- उत्पादनात वाढ: पिकांचे उत्पादन आणि दर्जा वाढतो.
वापरण्याची वेळ आणि प्रमाण
या खताचा वापर रान बांधणीवेळी किंवा बेसल डोस म्हणून केला जातो. दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी खताचे प्रमाण विभागून दिले पाहिजे.
पिकांसाठी खताचे प्रमाण (किलो प्रति एकर):
- द्राक्ष: ८००-१०००
- डाळिंब: ८००-१०००
- ऊस: १०००-१२००
- केळी: १०००-१२००
- कांदा, टोमॅटो: ५००-६००
- कापूस: ५००-६००
किण्वित सेंद्रिय खत (FOM) हे रासायनिक खतांच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे. हे खत पर्यावरणास हानिकारक नाही तसेच जमिनीची पोषणतत्वे वाढवते. शेतकऱ्यांनी या खताचा वापर करून अधिक चांगले उत्पादन मिळवू शकतात.