कृषिपंपांना ‘ऑटो स्विच’चा वापर टाळा; महावितरणचे आवाहन
13-11-2025

कृषिपंपांना ‘ऑटो स्विच’चा वापर टाळा; महावितरणचे आवाहन
शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ‘ऑटो स्विच’ऐवजी ‘कॅपॅसिटर’ बसवून सहकार्य करावे, असे आवाहन वाशीम जिल्हा ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी केले आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप आपोआप सुरू करण्यासाठी अनेक शेतकरी ऑटो स्विच बसवतात. मात्र, त्यामुळे परिसरातील सर्व पंप एकाच वेळी सुरू होत असल्याने रोहित्रावर ताण वाढतो आणि परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या खंडित होणे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते.
रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर कृषिपंपांचा वापर वाढला आहे. अशा वेळी प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार ‘कॅपॅसिटर’ बसविणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे रोहित्र जळणे वा कमी दाबाचा वीजपुरवठा होण्याचे प्रमाण कमी होते.
‘कॅपॅसिटर’मुळे —
वीजदाब योग्य राखला जातो
विद्युत केबल जळण्याचे प्रमाण घटते
वीज वापरात बचत होते
रोहित्रांवरील भार ३०% पर्यंत कमी होतो
कृषिपंप जळण्याची शक्यता कमी होते
अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळतो
मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कॅपॅसिटर बसविलेले नाहीत किंवा बसविलेले बंद आहेत. अशा सर्वांनी तत्काळ कॅपॅसिटर बसवून किंवा दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहन अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कार्यक्षम ऊर्जा वापरासाठी ‘ऑटो स्विच’ऐवजी ‘कॅपॅसिटर’चा वापर करणे गरजेचे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.