IMD Alert : हवामान विभागाचा ताजा हवामान अंदाज जारी
31-08-2023
IMD Alert : हवामान विभागाचा ताजा हवामान अंदाज जारी
सप्टेंबर महिन्यातही पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील
IMD Alert : पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढवली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल. पण सप्टेंबर महिन्यातही पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट अधिकच गडद झाले आहे.
हवामान विभागाचे महासंचालक डाॅ. मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सप्टेंबरचा पावसाचा अंदाज आज जाहीर केला. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंडा दिला. त्यामुळे सहाजिक शेतकऱ्यांचं लक्ष हवामान विभागाच्या अंदाजाकडे होतं. पण हवामान विभागाच्या अंदाजाने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.
September Rain : हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी ९१ ते १०९ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्ते केला. पण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
ऑगस्टच्या शेवटी आयओडी म्हणजेच इंडियन ओशन डायपोल सक्रिय झाला. आयओडी नेमका काय आहे आणि त्याचा माॅन्सूनच्या पावसाशी काय संबंध आहे? याचा व्हिडिओ तुम्हाला अॅग्रोवनच्या युट्यूबर चॅनलवर पाहायला मिळेल. आयओडी सक्रिय झाल्याने देशात सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सप्टेंबरमध्ये ईशान्य भारत, पूर्व भारताच्या शेजारील भाग, हिमालयाच्या पायथ्याच्या अनेक भागात तसेच पूर्वमध्य आणि दक्षिण द्विपकल्पाच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर देशाच्या इतर भागात सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
माॅन्सून हंगामातील १ जून ते ३१ ऑगस्ट या काळात आतापर्यंत पावसाचा विचार करता देशात १० टक्के तूट आली आहे. दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात आतापर्यंत सरासरीपेक्षा १७ टक्के कमी पाऊस पडला. तर मध्य भारतातील पाऊसमान १० टक्क्यांनी कमी आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यातही आतापर्यंत पावसात मोठी तूट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा होती. पण सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार, असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
source : agrowon