दस्तऐवज नोंदणी प्रक्रियेतील कायदेशीर तरतुदीबद्दल येथे सविस्तर जाणून घ्या
13-08-2024
दस्तऐवज नोंदणी प्रक्रियेतील कायदेशीर तरतुदीबद्दल येथे सविस्तर जाणून घ्या
दस्तऐवज नोंदणीला देण्यापूर्वी दस्त तयार करणे, आवश्यक कागदपत्रे, परवानग्या संकलित करणे, मिळकतीचे मूल्यांकन तपासून घेणे, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, दस्त हाताळणी फी भरणे, साक्षीदारांसमोर स्वाक्षरी करणे, आदीची पूर्वतयारी करणे आवश्यक असते.
दस्त नोंदणीसाठी सादर केल्यानंतर कायदेशीर तरतुदींचे बंधन नसेल, तर तो दस्त नोंदणीस स्वीकारला जातो. दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणीसाठी सादर केल्यावर टोकन रजिस्टरमध्ये नोंद करून टोकन घ्यावे लागते.
दुय्यम निबंधकांद्वारे दस्ताची पडताळणी झाल्यावर कागदपत्र किंवा दस्तातील चुका काढल्यास त्या चुका योग्य असल्यास सेवा हमी नियम ६ नुसार पोहोच मागणी करून किंवा जर दुय्यम निबंधक यांना दस्ताची नोंदणी नाकारावयाची असेल तर त्यांनी नोंदणी अधिनियम १९०८ कलम ७१ नुसार कारणे नमूद करावी लागतात.
लेखी आदेश पारित करून आदेशातील कारणे, नोंदणी पुस्तक क्रमांक दोनमध्ये नमूद करणे आवश्यक असते. याबरोबरच दस्त नोंदणी नाकारला असा शेरा दस्तावर नमूद करून दस्त संबंधित पक्षकारास परत करणे.
तसेच पुस्तक क्रमांक दोनमध्ये नमूद केलेल्या नोंदीच्या प्रती विनाशुल्क व विना विलंब पुरविणे आवश्यक असल्याने त्याची मागणी करणे अशा पद्धतीचा आग्रह धरल्यास दुय्यम निबंधकाला दस्त नोंदणी करणे भाग पडते. एक दिवसात दस्त नोंदणी करणे सेवा हमी कायद्याने गरजेचे आहे.
एक दिवसात दस्त नोंदणी न केल्यास दुय्यम निबंधक यांच्या विरोधात जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्याकडे पहिले अपील दाखल करता येते. दुसरे अपील नोंदणी महानिरीक्षक, तर अंतिम अपील लोकसेवा हक्क आयोगाकडे करता येते.
न्यायोचित कारण नसल्यास दुय्यम निबंधकाला ५०० ते ५००० रुपयांपर्यंत शास्ती लावली जाते. दुसऱ्यांदा कसूर केल्याचे सिद्ध झाल्यास कारणे दाखवा नोटीस काढली जाते व शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.