कमी दाबाच्या प्रभावामुळे कोकणात पुढील ४ दिवस पावसाचे अंदाज…
11-10-2024
कमी दाबाच्या प्रभावामुळे कोकणात पुढील ४ दिवस पावसाचे अंदाज…
केरळ किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र सध्या लक्षद्विप वरून अरबी समुद्राच्या मध्यावर पोहोचत आहे. परिणामी आज गुरुवार दि. १० ते रविवार दि. १३ ऑक्टोबर दरम्यानच्या ४ दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यांत भाग बदलत दुपारनंतर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
सोमवार दि. १४ ऑक्टोबर पासून काही दिवसासाठी पावसामध्ये काहीशी उघडीप जाणवेल. शेतपिके व फळबागांना ह्या पावसापासून कदाचित काहीसा अपाय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
परंतु ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आवर्तनातील पावसापासून म्हणजे मंगळवार दि. २२ ऑक्टोबर नंतर होणाऱ्या पावसाचा कोकणातील शेतपिके व फळबागांना फायदाच होईल असे वाटते.
दिड किमी उंचीवर महाराष्ट्राच्या भुभागावर ताशी २८ तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ताशी ३७ किमी वेगाने पूर्वेकडून ह्या अरबी समुद्रातील हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे वारे वाहत आहे.
दोन्हीही समुद्रातून होणाऱ्या बाष्प पुरवठ्यामुळे रविवार दि. १३ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्राबरोबर मुंबईसह कोकणातही हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस अजूनही नंदुरबार पर्यंतच जागेवर खिळलेला आहे.