मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय; पहा शेतकऱ्यांसाठी काय?
11-11-2025

मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय; पहा शेतकऱ्यांसाठी काय?
Cabinet Meeting Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (११ नोव्हेंबर) राज्याची महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, तसेच विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.
या बैठकीत जलसंपदा, सहकार, वित्त विभाग आणि विधी व न्याय विभाग या खात्यांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळाने पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरण आणि आर्थिक नियोजन प्रक्रियेला चालना मिळणार आहे.
तसेच हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस साठवण तलावासाठी ९० कोटी ६१ लाख रुपये निधी देण्यात आला आहे. याशिवाय हिंगोलीतील सुकळी तलावासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमुळे जलसंचय क्षमता वाढून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
याशिवाय नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ग्रामीण भागातील आर्थिक संस्था अधिक सक्षम होणार आहेत.
या बैठकीत राज्याच्या पायाभूत सुविधा, सिंचन, आणि वित्त व्यवस्थापन क्षेत्रातील विकासासाठी एकत्रितपणे पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली.