अखेर मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले, आता महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
01-06-2024
अखेर मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले, आता महाराष्ट्रात कधी पोहोचणार ?
भारतीय हवामान खात्याने मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. विशेष म्हणजे फक्त केरळच नाही तर ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये मान्सूनने आगेकूच केली आहे. आता मान्सून केरळमध्ये पोहोचला असल्याने महाराष्ट्रात कधी दाखल होणार हा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रात कधी पोहोचणार मान्सून?
खरेतर रेमल चक्रीवादळामुळे केरळच्या दिशेने येणाऱ्या मान्सूनवर परिणाम होणार अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक ठरले आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मानसून केरळमध्ये नेहमीच्या तारखेच्या 2 दिवस आधीच दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला दाखल होत असतो. यंदा मात्र तो 30 मे 2024 ला दाखल झाला आहे.
आता मान्सून टप्प्याटप्प्यानं पश्चिम किनारपट्टीवरून पुढे सरकणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात किंवा येत्या दहा दिवसांनी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम मान्सून तळ कोकणात दाखल होणार आहे.
यानंतर तो मुंबईकडे जाईल आणि मग 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे. आय एम डी ने यंदाच्या जून महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा काहीसा कमी राहणार असे म्हटले आहे. पण, तरीही संपूर्ण मोसमात मात्र तो सामान्यहून अधिक बरसणार आहे.