केरळमध्ये मान्सूनची धडक पहा महाराष्ट्रमध्ये कधी येईल
30-05-2024
केरळमध्ये मान्सूनची धडक पहा महाराष्ट्रमध्ये कधी येईल
रेमल चक्रीवादळाच्या जोरावर नैऋत्य मान्सून केरळच्या किनारपट्टीवर आणि इशान्येकडील काही भागांमध्ये एक दिवस आधीच धडकला आहे. भारतीय हवामान विभागाने IMD ने याबाबत नुकतीच माहिती दिली. बुधवारच्या हवामान अंदाजातही "पुढील २४ तासांत केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरु होण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील" असे भारतीय हवामान खात्याने सांगितले होते.
कडक उन्हाने तापलेल्या जमिनीवर आता लवकरच मान्सून सरी बरसणार आहेत. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाला नेहमीपेक्षा दोन दिवस आधीच पोषक वातावरण तयार झाले आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये साधारणतः १ जूनच्या सुमारास दाखल होतो. आणि १५ जुलैच्या आसपास संपूर्ण देश व्यापून टाकतो. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी सकाळी जाहीर केले की नैऋत्य मान्सून येत्या २४ तासांत केरळ किनारपट्टीवर दाखल होईल.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात १० जूनपासून मान्सूनला पोषक वातावरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात विविध ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून काही भागात उष्णतेची लाट असून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊसही आहे.
केरळमध्ये मान्सून घोषित करण्यासाठी निर्धारित ३ निकषांपैकी दोन निकष पूर्ण होत आहेत. यामध्ये केरळच्या १४ स्थानकांवर आणि आजूबाजूच्या परिसरातील भागात सलग दोन दिवस २.५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडणे अपेक्षित आहे. आणि या भागातील आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन २०० WM पेक्षा कमी असावे.
दरम्यान हवमान विभागाने सांगितलेल्या मान्सून अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी परिस्थितीही अनुकूल होत आहे. यामध्ये दक्षिण अरबी समुद्राचे अधिक भाग, मालदीवचे उर्वरित भाग आणि कोमोरिन क्षेत्रासह लक्षद्वीप परिसर आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागराचा समावेश असणार आहे.