Soybean Disease : तुमचं सोयाबीन पिवळं पडतंय? तर असू शकतो मोझॅकचा प्रादुर्भाव
07-08-2023
Soybean Disease : तुमचं सोयाबीन पिवळं पडतंय? तर असू शकतो मोझॅकचा प्रादुर्भाव
या रोगाची लक्षणे आणि उपाययोजना काय? जाणून घ्या सविस्तर
Mosaic Disease : यंदा उशिरा झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची उशीरा पेरणी झाली. सध्या बऱ्याच ठिकाणी अतीवृष्टी झालीय त्यामुळे ज्या ठिकाणी पेरणी झाली त्याठिकाणच्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. त्यामुळे शेतकऱ्यांवर येणाऱ्या अडचणी काय कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. यात आनखी भर म्हणजे अशा परिस्थितीतूनही वाचलेलं सोयाबीन हंगामाच्या सुरवातीलाच पीक पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाच्या विळख्यात सापडलय. गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर संपूर्ण पिकाचं उपटून टाकावं लागलं होतं. यंदाही पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या रोगामुळे १५ ते ७५ टक्क्यांपर्यंत सोयाबीन उत्पादनात घट येऊ शकते. हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. या रोगाची लक्षणे आणि उपाययोजना काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
तुमचं सोयाबीन जर पीवळ पडत असेल तर त्यावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला असं समजा. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात. पाने जसजशी परिपक्व होत जातात तस त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात. शेंगातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा पोचट होतात त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येते. दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन करावं लागत.
या रोगाच एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करताना या रोगाला बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावं. मोझॅक झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी समूळ काढून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायोमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडासायहॅलोथ्रीन ९.६ टक्के झेडसी ५० मिली किंवा असिटामिप्रीड २५ टक्के अधिक बाइफेन्थ्रीन २५ टक्के डब्ल्यूजी १०० ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ओडी १४० मिली यापैकी एका किडनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी.
पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत. फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा. मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन करावे. कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे. पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो. पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीडनाशकाची फवारणी करावी. अशाप्रकारे या रोगाचं सुरुवातीपासूनच व्यवस्थापन केल्यास होणार नुकसान टाळता येतं.
source : agrowon