या आठवड्यात नाफेडने कांदा खरेदीचे आठवड्याचे बाजारभाव जाहीर करताच लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजारसमितीमध्ये कांद्याचे भाव वधारले असून त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात लासलगाव बाजारसमितीत कांद्याला सरासरी २४०० रुपये ते २५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होते. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीतही २५०० रुपयांच्या आसपास असे कांद्याचे बाजारभाव होते. त्याच वेळेस नाफेडचे खरेदी दर मात्र २१०० रूपयांच्या आसपास होते.
नाफेडचे दर हे प्रयत्तेक आठवड्याला डोकामार्फत अर्थात केंद्रातील ग्राहक संरक्षण विभाग ठरविणार होता. त्यानुसार या आठवड्याचे कांदा खरेदी दर रुपये २५५५ प्रति क्विंटल बकरी ईदच्या सुटीनंतर म्हणजेच मंगळवार दिनांक १८ जून रोजी जाहीर झाले आहेत . हे दर जाहीर झाल्याबरोबर स्थानिक बाजारात व्यापार्यांनीही कांद्याचे खरेदी दर वाढवले.
सध्या लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या महत्त्वाच्या बाजारसमित्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून सरासरी ३ हजार ते ३१०० रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव आहेत. या संदर्भात नाफेडचे संचालक केदा नाना आहेर यांनी 'लोकमत ॲग्रो'ला माहिती दिली की नाफेडच्या दरांचा स्थानिक कांदा बाजारभावांवर नेहमीच सकारात्मक परिणाम होत असतो. आतही नाफेडने दर जाहीर करताच स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी दर वाढला आहे. खरेदीदारांची संख्या जास्त असल्यानेही कांदा दर वाढल्याचे श्री. आहेर यांनी स्पष्ट केले.
नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधीने सांगितले की नाफेडने कांदा खरेदी दर वाढवले, तर स्थानिक बाजारातील कांदा खरेदीवर त्याचा परिणाम होत असतो. नाफेडच्या वाढलेल्या दरानंतर लासलगाव, पिंपळगाव बाजारसमितीत कांदा बाजारभाव वाढल्याचे यापूर्वीही घडलेले आहे. ही शेतकर्यांसाठी चांगली बाब आहे.
नाफेडचा भाव दररोज जाहीर होणार:
मागील आठवड्यापासून डोकामार्फत नाफेडचे बाजारभाव जाहीर होत आहेत. सुरूवातीला हे बाजारभाव दर आठवड्याला जाहीर होणार असे सांगण्यात येत होते. त्यानुसार या आठवड्यात कांदा बाजारभाव जाहीरही झाले. मात्र आजपासून या नियमात केला जात असून आता नाफेड कांदा खरेदीचे भाव दररोज जाहीर होणार आहेत. नाफेडचे संचालन केदानाना आहेर यांनी 'लोकमत अॅग्रो'ला ही माहिती दिली. येणार्या काळात बाजार समित्यांच्या आवारातच नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. "नाफेडचे बाजारभाव जाहीर झाल्यानंतर जर बाजारात कांद्याचे भाव वाढत असतील, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की बाजारात कांद्याची उपलब्धता कमी आहे. बाजारात आवक वाढते आणि जेव्हा कांद्याचे बाजारभाव पडतात, खरं तर त्या वेळेस नाफेडने चांगला दर देऊन शेतकर्यांचा कांदा खरेदी करून साठवला पाहिजे, पण सध्या तसे होताना दिसून येत नाही.