Pik Vima : पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत नवीन अपडेट!
24-08-2023
Pik Vima Yojana : पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत नवीन अपडेट!
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी अधिसूचना जारी करण्याचे आदेश देण्यात आले.
Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत चालू खरिपात प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी अधिसूचना जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. “काही जिल्ह्यांमध्ये ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याचे निदर्शनास आले आहे. विमा योजनेतील तरतुदीनुसार चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनात गेल्या सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्यास येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तेथे संयुक्त पाहणी करून अधिसूचना जारी करावी,” असे या पत्रात म्हटले आहे.
Pik Vima : अधिसूचना जारी करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित भागातील पावसाची आकडेवारी, हवामान निर्देशांक, उपग्रह प्रतिमा, सुदूर संवेदन निर्देशांक, दुष्काळ अहवाल, पीक परिस्थिती तसेच माध्यमांमधील माहितीचा आधार घ्यावा लागेल. तसेच संयुक्त पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधींनादेखील सोबत घ्यावे लागेल.
राज्यात अनेक ठिकाणी पावसात सलग २१ दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा खंड पडलेला आहे. त्यामुळे पिकांच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची दाट शक्यता कृषी विभागाला वाटते आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना वेळेत काढली तर शेतकऱ्यांना भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत विमा भरपाई मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्र पत्र पाठवून कार्यवाही करण्याबाबत सुचविल्याचे सांगण्यात आले.
source : agrowon