Onion Update : कांदा प्रश्नासाठी २९ सप्टेंबरला दिल्लीत महत्त्वाची बैठक
27-09-2023
Onion Update : कांदा प्रश्नासाठी २९ सप्टेंबरला दिल्लीत महत्त्वाची बैठक
मागील आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचा संप कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संप मागे घेऊन तात्काळ कांदा खरेदी करावी, असं आवाहन यावेळी राज्यातील मंत्र्यांनी आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. मात्र या दोन्ही बैठकात तोडगा निघाला नाही. यामुळे व्यापाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. लासलगावसह जिल्ह्यातील १७ बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होऊ लागलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देखील कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली आहे. मात्र बैठकीतूनही कोणता तोडगा निघाला नाही. व्यापाऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारशी संबंधित असल्याने त्याबाबत काल सह्याद्री अतिथी गृहावर राज्याचे मंत्री आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीतूनही कोणता तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आणखी संकटात सापडत चालले आहेत.
राज्यात पेटलेला कांदा प्रश्न सोडवण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीला राज्याचे मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित असतील, अशीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
व्यापाऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
१) कांद्यावर लादलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे.
२)देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी.
३) बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये.
४) ग्राहकांना रेशन मार्फत खरेदी केलेला कांदा द्यावा.
५) संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी.
६) बाजारभाव वाढल्यानंतर चौकशी करू नये.