यंदा कांद्याची लागवड मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज आहे.
26-06-2024
![यंदा कांद्याची लागवड मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज आहे.](/_next/image?url=https%3A%2F%2Fstatic-img.krushikranti.com%2Fimages%2F1719406624468.webp&w=3840&q=75)
यंदा कांद्याची लागवड मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज आहे.
स्टॉक लिमिटमुळे पुढच्या महिन्यात तूर व हरभऱ्याचे भाव कमी होतील. तर टोमॅटो आणि कांद्याचेही भाव नियंत्रणात राहतील, असा विश्वास केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी व्यक्त केला. सरकार डाळी व भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात ठेवण्याचे सर्व ते प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदा कांदा व टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने भाव वाढले. कांद्याचे भाव पाडण्यासाठी तर सरकारने जे करणे शक्य आहे ते सर्व केले. पण कांद्याची उपलब्धताच कमी असल्याने कांद्याचे भाव हे वाढले. त्यात कांदा आता मोठ्या प्रमाणात शेतकर्यांच्या हातून गेला आणि व्यापाऱ्यांच्या चाळीत पडून आहे. हे व्यापारी शेतकर्यांप्रमाणे काही पॅनिक सेलिंग करणार नाहीत. शेतकऱ्यांकडे ही काही प्रमाणात कांदा आहे. पण सर्वच कांदा शेतकर्यांकडे नाही.
ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितले आहे की, यंदा खरिपात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा कांद्याची लागवड मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढण्याचा अंदाज आहे. यंदाच्या खरिपात कांद्याची लागवड ३ लाख ७६ हजार हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. मागच्या खरिपात २ लाख ८५ हजार हेक्टरवर अशी लागवड झाली होती. लागवड वाढल्यामुळे खरिपातील कांदा उत्पादनही वाढेल. खरिपातील कांदा सणांच्या काळात बाजारात येईल. त्यामुळे सणासुदीत ग्राहकांना स्वस्त कांदा मिळेल, असा संदेश त्यांनी दिला.
पण वस्तुस्थिती ही आहे की, रब्बीचे उत्पादन जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगत आहेत. आता तुम्हाला माहित आहे की वर्षभर कांदा पुरवठ्यात रब्बीतील कांद्याचा वाटा ७० टक्क्यांपर्यंत असतो. आता याच रब्बीतील उत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यात तूट तर असणार.
पण सरकारच्या मते, उत्पादन केवळ १८ टक्क्यांनी कमी झालं. गेल्यावर्षी २३६ लाख टन उत्पादन झाले होते. ते यंदाच्या रब्बीत १९३ लाख टनांवर स्थिरावले. त्यात सरकारच्या धोरणांमुळे कांदा निर्यात कमी झाली. त्यामुळे कांदा उत्पादन कमी झाले तरी कांद्याचा तुटवडा सांगितला जातो त्या प्रमाणात नसेल, असेही सरकारच्या वतीने सांगितले जात आहे.
म्हणजेच काय तर कांदा बाजारात मागच्या काही आठवड्यांपासून सरकार व व्यापार्यांकडून काहीसा संभ्रम निर्माण होताना दिसून आहे. सरकारने एक लाईन धरली आणि व्यापार्यांची लाईन दुसरी आहे. या परिस्थितीत जाणकारांनी सांगितलं की, शेतकऱ्यांनी दिवळीपर्यंत पुरेल असा टप्प्याटप्प्याने कांदा विकावा.
बाजारातील अचानक होणारे चढ उतार आणि चर्चा यांकडे दुर्लक्ष केलेले बरे. निधी खरे यांनी सांगीतले की, स्टॉक लिमिटमुळे तूर आणि हरभरा डाळीचे भाव कमी झाले. सरकार बाजारावर सध्या माईंड गेम खेळत आहे. खरे तर तूर आणि हरभऱ्याची टंचाई आहे. त्यामुळे भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच असल्याचे अभ्यासक सांगत आहेत.