कांदा दरात वाढ, जाणून घ्या किती रुपयांपर्यंत पोहोचणार भाव...
09-11-2024
कांदा दरात वाढ, जाणून घ्या किती रुपयांपर्यंत पोहोचणार भाव...
अखेर बांगलादेशाने कांदा आयात शुल्क हटवले आहे. ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. पण पुढील दोन महिन्यांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या पत्रकावरून दिसून येत आहे. मागील अनेक महिन्यापासून बांगलादेशाने आयात शुल्क लावले होते.
त्यामुळे भारतीय कांदा निर्यात होत नव्हता, तसेच बाजारभाव देखील मिळत नव्हता. पण आता बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने (NBR) कांद्याच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि नियामक शुल्क पूर्णपणे मागे घेतले आहे. स्वयंपाकघरातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किममध्ये रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
त्याबरोबर एनबीआरच्या अध्यक्षांनी बुधवारी स्वाक्षरी केलेल्या पत्राद्वारे ही माहिती दिली. १५ जानेवारी २०२५ पर्यंत हे आयात शुल्क मागे घेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी, ३१ ऑक्टोबर रोजी, बांगलादेश येथील व्यापार व शुल्क आयोगाने कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याच्या ५ टक्के सीमाशुल्क पूर्णपणे मागे घेण्याचा प्रस्ताव दिला होता.
त्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे आता भारतामधील व्यापाऱ्यांना कांद्याची निर्यात थेट बंगलादेशात करता येणार आहे.
कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता:
बांगलादेशने आयात शुल्क हटविल्याने यंदा कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. बांगलादेश आता भारतामधून अधिकाधिक कांदा आयात करण्यास सुरुवात करेल.
परिणामी कांद्याला चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांबरोबरच कांदा व्यापाऱ्यांना सुद्धा होईल, असे दिसून येत आहे.