खरीप उत्पादनात मोठी घट, शेतकरी आर्थिक अडचणीत...
19-11-2024
खरीप उत्पादनात मोठी घट, शेतकरी आर्थिक अडचणीत...
जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरिपात सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड झाली; पण प्रारंभापासून निसर्गाने शेतकऱ्यांची साथ सोडली. पूरपरिस्थिती व अतिवृष्टीने शेतीमधील पिकांचे कंबरडे मोडले. उरली कसर कीड व रोगांच्या आक्रमणांनी पूर्ण केली.
परिणामी धानाचा उतारा कमालीने कमी झाला आहे. शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. कमी उत्पन्नातून झालेला खर्च कसा काढावा व भविष्याची तरतूद कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे.
शेतकऱ्यांची धान कापणी व मळणीही जोमात सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मळणी झाल्या आहेत, त्यांचा धानाचा उतारा पायाखालची जमीन सरकविणारा आहे. एक एकरामधून किमान १६ ते २५ पोती धानाचा उतारा यायला हवा होता. पण, यावर्षी केवळ ७, ८ व ९ पोती धानाचा उतारा येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शेतकरी कंगाल, कर्ज परतफेडीचे संकट:
यंदाच्या खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी पुरता नागविला गेला आहे. आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम करताना उचल केलेले शासकीय तसेच खासगी कर्ज कसे फेडावे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
घरी कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी धानाची पिसाई करावी की पूर्ण विकून पुढे मजुरी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
लष्करी अळी व रोगांमुळे झाली वाताहात:
जिल्ह्यातील हलके, मध्यम प्रकारच्या धानाची कापणी आणि मळणी सुरु असताना भारी धानावर लष्करी अळीने थैमान घातले. परिपक्च अवस्थेतील भारी धानाच्या लोंबांचा सडा जमिनीवर पडला. उरली सुरली कसर तुडतुडा व अन्य रोगांनी पूर्ण केली.
एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर:
यंदा शेतकऱ्यांचा धानाचा उतारा कमालीने घटला आहे. आर्थिक संकटाने शेतकरी खचले आहेत. मशागतीपासून पहे भरणी ते रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणीपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च झाला; पण एवढा खर्च करूनही उत्पन्न केवळ १० ते १५ हजारांचे हाती लागत आहे.
एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर आल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.