आडसाली ऊस उत्पादन वाढीचे पंचसुत्री तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन…
09-08-2024
आडसाली ऊस उत्पादन वाढीचे पंचसुत्री तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन…
आडसाली ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, तसेच सुधारीत ऊस वाणांचा आणि दर्जेदार बियाण्याचा वापर, ५ फुट सरीमध्ये रोप लागवड तंत्र, ठिबक सिंचनद्वारे पाणी व खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि आंतरमशागत या पंचसुत्री तंत्रज्ञानाचा वापर केल्यास चांगले अपेक्षित उत्पादन मिळू शकेल.
आडसाली ऊसाच्या लागवडीसाठी रासायनिक खतांचे नियोजन:
आडसाली ऊसाला हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद तसेच १७० किलो पालाशची शिफारस केली आहे. युरिया देताना निंबोळी पेंडीच्या भुकटी बरोबर ६:१ अशा प्रमाणात मिसळून द्यावीत.
आडसाली ऊसाला खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रति हेक्टर):
वेळ | नत्र | स्फुरद | पालाश | युरिया | सिं.सु.फॉ | म्यु.ऑ.पो |
---|---|---|---|---|---|---|
लागणीच्या वेळी | 40 | 85 | 85 | 87 | 531 | १४२ |
लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी | 160 | 34 | 7 | - | - | - |
लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी | 40 | 87 | - | - | - | - |
मोठ्या बांधणीच्या वेळी | 160 | 85 | 85 | 347 | 531 | १४२ |
एकूण | 400 | 170 | 170 | 868 | 1062 | २८२ |
विद्राव्य खतांचा वापर:
- ठिबक सिंचनाने खते दिल्यास खतांची कार्यक्षमता ९० टक्क्यापर्यंत वाढते, तर प्रचलित पध्दतीत ३५ ते ४० टक्के खते उपयोगी पडतात.
- ऊसाच्या लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते.
- नत्रासाठी युरिया, स्फुरदयुक्त खते देण्यासाठी फॉस्फरिक आम्ल किंवा १२:६१:०० या खतांचा वापर करावा.
- पालाश खतांच्या वापरासाठी पांढरे पोटॅशियम क्लोराईड वापरावे. त्याशिवाय पाण्यात विरघळणाऱ्या मिश्र खतात १९:१९:१९,२०:२०:२०, २०:०९:२०, १५:०४:१५ तर द्रवरुप खतात ४:२:८, ६:३:६, ६:४:१०, १२:२:६, ९:१:६ अशा विविध ग्रेडची खते उपलब्ध आहेत. ही खते प्रमाणबध्द व शिफारसीप्रमाणे वापरावीत.