सोयाबीन पीकावरील किड व्यवस्थापन व उपाययोजना...
11-07-2024
सोयाबीन पीकावरील किड व्यवस्थापन व उपाययोजना...
सध्या सगळीकडे सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे व सध्याचे वातावरण हे पाऊस व सततचे ढगाळ असल्यामुळे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या अळ्यांचा तसेच खोड किडीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच असे वातावरण पुढेही सतत राहिल्यास सोयाबीनवर पाने खाणारी अळी म्हणजेच स्पोडोप्टेरा या लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत शेतकर्यांनी वेळीच किडीचा प्रादुर्भाव ओळखून खालील प्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहन वसंत राव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी. गडदे आणि श्री.एम.बी. मांडगे यांनी केले आहे.
किडीवरील उपाय योजना:
- पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पीक तण मुक्त ठेवावे.
- बांधावर असणार्या किडीच्या पुरक खाद्य वनस्पतींना काढून टाका.
- किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा नायनाट करावा.
- पाने खाणारी अळीची अंडी आणि सुरवातीच्या अवस्थेतील अळी ग्रस्त असलेली पाने अलगद तोडून ती नष्ट करावीत.
- हिरवी घाटे अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरीता सर्वेक्षणाकरीता प्रत्येक किडीसाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे शेतात लावावेत.
- शेतात इंग्रजी 'T' अक्षरांसारखे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत.
- पाने खाणार्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणू ४०० मि.ली. किंवा नोमुरिया रिलाई या जैविक बुरशीची ८०० ग्रॅम प्रति एकरी फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी.
पाने खाणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन:
- ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन १५०० पीपीएम ५०० मिली प्रती एकरी फवारणी करावी.
- पिकांचे नियमित सर्वेक्षण करून आणि किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यासच प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली किंवा इथ ऑन ५० टक्के ६०० मिली किंवा थायमिथाक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के (पूर्व मिश्रीत किट नाशक) ५० मिली किंवा प्रादुर्भाव खूप जास्त असल्यास क्लोराट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ६० मिली प्रती एकर फवारावे.
- किटकनाशकांची फवारणी आलटून-पालटून करावी. एका वेळी एकच किटकनाशक फवारावे.
- वरील किटकनाशक सोयाबीनवरील दोन्ही प्रकारच्या किडींचे व्यवस्थापन करतात.
वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. मिसळून फवारणी केल्यास पिकाला अपाय होऊ शकतो तसेच कीडनाशकांचा अपेक्षित परिणामही दिसून येणार नाही त्यामुळे ती आवश्यकतेनुसार वेगळी वेगळी फवारावी. तसेच लागोपाठ एकच एक कीटकनाशक वांरवार फवारू नये.
हे किटकनाशकाचे प्रमाण हे सर्व प्रकारच्या फवारणी पंपाकरिता असुन एकूण प्रमाण प्रती एकर याप्रमाणेच वापरावे. फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
किडनाशके फवारणी करताना योग्य संरक्षक विषयी काळजी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.