फळबाग लागवडीची पूर्वतयारी नक्कीच होणार फायदा
28-01-2023
फळबाग लागवडीची पूर्वतयारी नक्कीच होणार फायदा
नवीन लागवड यशस्वी होण्यासाठी पूर्वतयारी योग्य रितीने करणे गरजेचे आहे. फळझाडांना अपेक्षित मुदतीत आणि अपेक्षित प्रमाणात उत्पन्न मिळविण्यासाठी सर्व बाबी लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे ठरते.
जमिनीची निवड
- फळझाडांच्या लागवडीमध्ये जागेची निवड ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण फळझाडांची लागवड ही साधारणतः कायमस्वरूपाची असते, त्यामुळे जागेची निवड करताना जर चूक झाली, तर कालांतराने ती दुरुस्त करणे कठीण होते म्हणून जमीन आणि हवामानाबरोबरच जागेच्या निवडीबाबतीत विचार करणे गरजेचे आहे.
- फळबागेकरिता जमीन निवडताना फक्त जमिनीचा पृष्ठभाग पाहून चालत नाही, तर त्याखालील मातीचे काळजीपूर्वक परीक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता लागवड करण्यापूर्वी 4-5 ठिकाणी 1 ते 1.5 मीटर खड्डे खोदून मातीचे परीक्षण करावे.
- फळझाडांच्या दृष्टीने सर्वसाधारण फळझाडांना कमीत कमी 1 मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमीन पाहिजे, तसेच जमिनीतील पाण्याची पातळी 3 मीटरच्या वर येणे उपयोगाचे नसते.
- फळझाडांकरिता गाळाच्या उत्तम निचऱ्याच्या जमिनी योग्य ठरतात. जमिनीच्या रासायनिक गुणधर्मांचा विचार करता, जमिनीचा आम्ल निर्देशांक 6 ते 7 पर्यंत असावा.
- जमिनीच्या नुसत्या वरून दिसणाऱ्या रंगावरून निवड करू नये. प्रत्येक फळझाडांची मुळे व एकूण मुळसंभार वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यावरून जमिनीची निवड करावी. ज्या जमिनीतून पाण्याचा उत्तम निचरा होत नाही, अशा जागेत कोणतेच फळझाड चांगले येत नाही.
- सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण जमिनीस भारी, मध्यम व हलकी असे म्हणतो. त्यानुसार फळझाडांची निवड करावी. हलक्या जमिनीत पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, द्राक्षे, पपई, सीताफळ, बोर, आवळा, कवठ, करवंद, चिंच, जांभूळ, फालसा, तर मध्यम जमिनीत आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू आणि भारी उत्तम निचऱ्याच्या जमिनीत केळी व पपई हे पीक चांगले येऊ शकतात. जमिनीतील चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तेथे आंबा, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी, लिंबू, तत्सम फळांची लागवड घेऊ नये.
पूर्व मशागत
जागेची निवड केल्यानंतर प्रथम झाडेझुडपे तोडून जमीन स्वच्छ करावी. नंतर जमीन उभी-आडवी दोन वेळा खोल चांगली कुळबाच्या पाळीने फोडून फळी फिरवून समपातळीत आणावी.
कुंपणाची सोय
नवीन लावलेल्या झाडांचे भटक्या गुरांपासून संरक्षण करणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी निवडलेल्या जागेभोवती चिलार, शिकेकाई, करवंद यांसारख्या काटेरी झुडपांचे कुंपण करावे.
बागेचे उष्ण वारे, थंडीपासून व वादळापासून संरक्षण करण्यासाठी निलगिरी, शेवरीसारख्या उंच सरळ वाढणाऱ्या झाडांची बागेच्या पश्चिम व दक्षिण बाजूने 2 ते 3 फुटांवर लागवड करावी.
काही वेळा वाऱ्याच्या अडथळ्यासाठी लावलेली झाडे बागेतील मुख्य फळझाडांबरोबर पाणी आणि अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा करतात. हे टाळण्यासाठी अडथळ्यांच्या झाडांपासून 10 फूट अंतरावर 3 फूट खोल व 2 फूट रुंद खड्डा खणून त्यामध्ये येणारी या झाडांची सर्व मुळे छाटून टाकावीत. अशा प्रकारे मुळ्या छाटण्याचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करावे.
वाणांची निवड
कोणत्याही पिकांची व्यापारी तत्त्वावर लागवड करावयाची झाल्यास या पिकांची उत्पादन क्षमता व प्रत उत्तम असणे आवश्यक आहे. यासाठी वाणांची निवड महत्त्वाची ठरते. विविध विभागांसाठी वेगवेगळ्या वाणांची शिफारस केलेली असते. आपल्या राज्यातील वातावरणात खालील फळझाडांच्या जाती अतिशय चांगल्या प्रकारे वाढतात.
फळपिकांचे नाव व सुधारित जाती
- संत्रा - नागपूर संत्रा, नागपूर सिडलेस
- मोसंबी - काटोल गोल्ड, न्युसेलर
- कागदी लिंबू - पीडीकेव्ही लाईम, साई सरबती, प्रमालिनी, विक्रम
- आंबा - हापूस, केशर, रत्ना, दशहरी, पायरी, नागीण, निलम, तोतापुरी, आम्रपाली
- पेरू - सरदार, अलाहबाद, सफेदा, ललित, श्वेता
- चिकू - कालीपत्ती, क्रिकेट बॉल
- सीताफळ - बालानगर, स्थानिक जाती
- बोर - कडाका, उमराण, छुहारा, सोनुर - 6
- चिंच - प्रतिष्ठान नं. 265, अकोला स्मृती
- आवळा - बनारसी, चकय्या, कांचन, कृष्णा, एन.ए.-7
लागवडीसाठी निवडलेल्या फळझाडांचा कोणता वाण योग्य आहे, त्याची तज्ज्ञांच्या साहाय्याने निवड करावी आणि तशा वाणांची खात्रीशीर आणि दर्जेदार कलमे, रोपे कोठे उपलब्ध होतील, याची माहिती करून घ्यावी.
फळबागांची आखणी व अंतर
- फळझाडांची आणि जागेची निवड झाल्यावर लागवडीसाठी आखणी करणे गरजेचे आहे, तेव्हा जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी. फळपिके लागवडीच्या चौरस, षटकोनी व उतार अशा निरनिराळ्या पद्धती आहेत. प्रत्येक पद्धतीने 1 हेक्टर क्षेत्रावर बसणाऱ्या झाडांची संख्या वेगवेगळी येईल.
- बहुतेक ठिकाणी फळबागा चौरस पद्धतीने लावतात. या पद्धतीत दोन ओळीतील आणि दोन झाडांमधील अंतर सारखेच असून, ओळी काटकोनात असतात. मशागतीच्या प्रत्येक फळझाडाचा विस्तार आणि मुळ्यांची वाढ यांचा विचार करून दोन झाडांमध्ये योग्य अंतर ठेवले पाहिजे. जेणेकरून प्रत्येक झाडांची योग्य वाढ होऊन फळधारणेसाठी आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश आणि हवा मिळेल.
- आखणीच्या दृष्टीने सोपी व सोईस्कर पद्धत ही चौरस पद्धत असली तरी यामध्ये सुरवातीच्या काळात बरीचशी जागा निरुपयोगी राहते म्हणून काही ठिकाणी त्रिकोनी किंवा षटकोनी पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीत दोन झाडांमधील अंतर सर्व बाजूने सारखे राहते, त्यामुळे हेक्टरी 15 टक्के झाडे अधिक बसतात, त्यामुळे उत्पादनही अधिक मिळू शकते.
- विविध झाडांसाठी शिफारस केलेले अंतर, खड्ड्याचा आकार व हेक्टरी बसणारी झाडे याचा विचार करावा. अशा प्रमाणे फळझाडांची लागवड न केल्यास अशा फळझाडांची वाढ चांगली होणार नाही आणि उत्पादनावरही अनिष्ट परिणाम होईल. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी महत्त्वाच्या फळझाडांच्या लागवडीसाठी योग्य अंतर ठेवले पाहिजे.
* डोंगर उताराच्या जमिनीवर लागवड करावयाची असल्यास उताराला आडवे चर खोदून त्यावर लागवड करावी, यालाच कंटुर लागवड म्हणतात.
खड्डे खोदणे व भरणे
- जेथे फळबागेची लागवड करावयाची आहे, तेथे योग्य त्या अंतरावर चौरस किंवा त्रिकोनी पद्धतीने आखणी करून खड्डे खोदावेत. जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्यांचा आकार ठरवावा.
- खड्डे खोदण्याचे काम उशिरात उशीर एप्रिल महिन्यात पूर्ण करावे. खड्डा खोदताना वरच्या व खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी. खड्डे तीन आठवडे तापू द्यावे, जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे खड्ड्याचे निर्जंतुकीकरण होईल.
- मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे परत भरावे. खड्डे मातीने भरताना ते निर्जंतुकीकरण करून वाळलेला पालापाचोळा 15 सें.मी. थरात भरावा. मातीमध्ये 20-25 किलो चांगले कुजलेले शेणखत + 2 ते 3 किलो गांडूळखत + 2 ते 3 किलो कडुलिंबोळी पेंड + 25 ग्रॅम टायकोडर्मा जीवाणू मिश्रण + 15 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू + 25 ग्रॅम ऍझॅटोबॅक्टर हे मिश्रण मिसळून घ्यावे. खड्डा जमिनीच्या वर 5 ते 7 सेंमी उंच भरून ठेवावा म्हणजे पावसाळ्याच्या सुरवातीबरोबरच लागवड करता येईल.
कलमे/ रोपांची निवड
फळबागांपासून काही वर्षांच्या मेहनतीनंतर उत्पन्न देणारे झाड न मिळाल्यास ते तोडून दुसरे लावणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. फळझाडांची कलमे, रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते म्हणून बागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहीत असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे, रोपे आणावी.
कृषी विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून शक्यतो रोपे आणावीत. शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवाना धारक रोपवाटिकेतून कलमे, रोपे घ्यावीत.कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत, यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत, की नाहीत याबाबींकडे अधिक लक्ष द्यावे.
फळझाडे लागवडीची वेळ
- फळझाडांची लागवड पावसाळा सुरू झाल्यावर आटोपणे नक्कीच फायद्याचे ठरते. पावसाळा नियमित सुरू झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत लागवड करावी. कारण या काळात जमिनीतील परिस्थिती मुळाच्या वाढीस अत्यंत पोषक असते.
- प्रथम लागवड करण्यापूर्वी अगोदरच भरून ठेवलेल्या खड्ड्यावर मध्यभागी कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा व मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथीन बॅग काढावी.
- मोकळा झालेला गोळा दोन्ही हातांत धरून खड्ड्याच्या मधोमध ठेवून हलकेच दाबावा व मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी. अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी, हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही, याची काळजी घ्यावी. आवश्यकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे.
- आधारासाठी पश्चिम बाजूस 6 इंच अंतरावर 4 ते 5 फूट इंचीची बांबूची काठी रोऊन त्यात कलम बांधावी.
- अशा तऱ्हेने पूर्वतयारी केल्यास आपणास फळबाग लागवडीत नक्कीच यश मिळेल आणि महाराष्ट्र शासनाचे कार्यान्वीत केलेला फळबाग लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यास मदत होईल.
महत्वाचे –
आपल्या शेतीतील कोणतेही पिक कोठे विकायचे, मालाला चांगला भाव मिळेल कि नाही, याची चिंता असेल, तर चिंता करणं सोडून द्या. कारण आता आपण krushikranti.com वर आपल्या मालाची जाहीरात देऊ शकता, जाहिरात दिल्यानंतर लगेच आपल्याला खरीद दारांचे फोन यायला सुरुवात होईल आणि आपला माल चांगल्या भावात विकला जाईल.
आपल्याला फळबाग लागवडीसाठी रोपांची आवश्यकता असेल, तर कृषिक्रांती वेबसाईट वर नर्सरी मध्ये आपल्याला उत्तम प्रतीचे कुठल्याही फळझाडाचे रोपे देणाऱ्या विश्वासातल्या नर्सरी चा संपर्क क्रमांक मिळेल. तिथून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. लाखो शेतकरी याचा फायदा घेत आहेत, तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल.
लेखक - डॉ. शशांक भराड
(लेखक उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)
source : vikaspedia