रब्बी कांदा उत्पादनाचे महत्त्व आणि किंमतींवरील परिणाम…
23-11-2024
रब्बी कांदा उत्पादनाचे महत्त्व आणि किंमतींवरील परिणाम…
भारतातील शेती व्यवसायातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याचे उत्पादन रब्बी हंगामात अत्यंत महत्त्वाचे असते. देशातील एकूण कांदा उत्पादनाचा ५०-६०% वाटा याच हंगामातून येतो. एप्रिल ते जून या कालावधीत रब्बी कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल होतो.
साठवण आणि विक्री:
शेतकरी काही प्रमाणात कांदा साठवून ठेवतात आणि डिसेंबरपर्यंत हळूहळू बाजारात विक्रीसाठी आणतात. यामुळे किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येतो.
उन्हाळ्यात (एप्रिल-जून) कांद्याच्या किंमती कमी होण्याची कारणे:-
मोठ्या प्रमाणात उत्पादन:
एप्रिल-जूनमध्ये रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते, ज्यामुळे पुरवठा प्रचंड वाढतो.
लहान शेतकऱ्यांवरील आर्थिक दबाव:
लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजांमुळे कांदा त्वरित विकावा लागतो.
साठवण सुविधांचा अभाव:
शेतकऱ्यांकडे साठवण चाळी उपलब्ध नसल्याने कांदा बाजारात विकला जातो. यामुळे अधिक पुरवठा होऊन किंमती कमी होतात.
ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान किंमतींचे चढ-उतार:-
इष्टतम साठवण:
रब्बी कांद्याची योग्य पद्धतीने साठवण आणि खरीप कांद्याचे सरासरी उत्पादन यामुळे मागणी व पुरवठ्याचा तोल साधला जातो.
- परिणाम: किंमती तुलनेने स्थिर राहतात.
अधिक साठवण:
मोठ्या शेतकऱ्यांकडून अधिक प्रमाणात कांदा साठवला जातो. निर्यातीतील अडचणींमुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक होतो.
- परिणाम: किंमती कमी होतात.
कमी साठवण:
प्रतिकूल हवामान, अपुऱ्या साठवण सुविधा, कमी उत्पादन किंवा अनुकूल निर्यात धोरणामुळे कांद्याचे कमी साठवण होते.
- परिणाम: पुरवठा कमी असल्याने किंमती वाढतात.
किंमतींवरील परिणाम करणारे महत्त्वाचे घटक:-
हंगामी उत्पादनाचे स्वरूप:
कांद्याचे उत्पादन हंगामानुसार बाजारात वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्ध होते.
साठवण क्षमता:
मोठ्या शेतकऱ्यांकडे साठवण क्षमता असल्यामुळे किंमतींचे नियमन होऊ शकते.
निर्यातीचा प्रभाव:
अनुकूल निर्यात धोरण असल्यास किंमती वाढू शकतात, तर प्रतिकूल वातावरणात किंमती कमी होतात.