महाराष्ट्रात पावसाचा कहर, रेड आणि ऑरेंज अलर्ट...
20-07-2024
महाराष्ट्रात पावसाचा कहर, रेड आणि ऑरेंज अलर्ट...
राज्यात सध्या सर्वदूर पावसाची हजेरी असून कोकण व पश्चिम घाटात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच विदर्भातील पूर्वे कडील जिल्ह्यांतही चांगला पाऊस कोसळत असून हवामान विभागाने आज पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला आहे.
कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सातारा या चार जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याबरोबर, उद्या (दि. २० जुलै) राज्य भरात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. तर कोकणामधील रत्नागिरी व विदर्भातील चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याबरोबर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, धुळे, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्यानंतरचे तीन दिवस म्हणजे २१, २२ आणि २३ जुलै रोजी राज्य भरामधील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने आज दिलेल्या हवामान अंदाजात वर्तवण्यात आली आहे.
२१ जुलै रोजी केवळ रत्नागिरी, रायगड आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात २२ जुलै रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असून कोणत्याही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही.
तसेच २३ जुलै रोजी केवळ रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत येलो अलर्ट दिला आहे.
मध्य महाराष्ट्रातील काही, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २३ जुलै रोजी पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.