Rajgira : राजगिरा लागवड तंत्रज्ञान
19-09-2023
Rajgira : राजगिरा लागवड तंत्रज्ञान
Rajgira : राजगिरा एक जलद गतीने वाढणारे पीक असून द्विदल वर्गीय पिकांमध्ये यांचा समावेश होतो. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये थोड्याबहुत ठिकाणी लागवड केली जाते. अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच बीड मधील काही ठिकाणी याची चांगल्या पद्धतीने लागवड होते. शरीरातील रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त असे हे पीक असून याचे मूळस्थान पूर्व व पश्चिम आशिया व आफ्रिका आहे.
राजगिर्याचा रंग हा सोनेरी, पिवळा किंवा काळा म्हणजेच वेगवेगळ्या जातीनुसार वेगवेगळा असतो. या लेखामध्ये आपण रब्बी हंगामात सलग पीक म्हणून लागवड केल्यास अधिक उत्पादन देणाऱ्या राजगिरा पिकाविषयी माहिती घेऊ.
Rajgira : राजगिरा ची सुधारित लागवडीयोग्य जात
1- फुले कार्तिकी-ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांनी विकसित केली असून लागवड केल्यानंतर एकशे दहा दिवसांमध्ये काढणीस तयार होते. ही जात पाच ते सात फुटांपर्यंत वाढते व पाने हिरव्या रंगाचे असतात.
या जातीच्या राजगिर्याचे कणीस लांबट व पिवळ्या रंगाचे असून त्याची लांबी 40 ते 60 सेमीमीटर पर्यंत असते. पीक पक्व झाल्यावर लवकर कापणी करावी लागते नाही तर दाणे पडतात व उत्पादनात घट होते. सुधारित तंत्राचा अवलंब केला तर एका एकर मध्ये पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळणे शक्य आहे.
राजगिरासाठी लागणारे जमीन व हवामान
मध्यम व भारी काळी कसदार,पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन याच्यासाठी महत्त्वाचे असून जमिनीचा सामू साडेसहा ते साडेसात पर्यंत असणे गरजेचे आहे.
पाणथळ तसेच चोपण जमिनीत व हलक्या जमिनीमध्ये लागवड करू नये. लागवड करण्याअगोदर नांगरट करून जमीन भुसभुशीत करून घेणे गरजेचे असून त्यानंतर एका एकरासाठी दोन ते तीन टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. राजगिरा पिकांच्या उत्तम वाढीसाठी थंड व कोरडे हवामान चांगले राहते. सरासरी 10 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असल्यास या पिकाची वाढ चांगली होते.
पेरणी कधी करावी?
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राजगिरा लागवड करावी. पेरणीस उशीर करू नये कारण उशीर झाल्यास सुरुवातीच्या काळातील कमी तापमानामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
तुम्हाला एका एकर मध्ये राजगिरा लागवड करायची असेल तर 600 ते 900 ग्रॅम बियाणे लागते. राजगिऱ्याची पेरणी करताना बियाण्यामध्ये बारीक वाळू किंवा रवा मिसळून घ्यावा कारण बियाणे खूप बारीक असते.
राजगिऱ्याच्या दोन झाडांमध्ये 15 सेंटिमीटर व दोन ओळींतील अंतर 45 सेंटिमीटर ठेवावे. पेरणी करताना एक ते दोन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलवर पेरणी करू नये.
पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे महत्त्वाचे
पेरणी केल्यानंतर सारे पाडून थोडेसे हलके पाणी द्यावे व जोमदार वाढीच्या काळात म्हणजेच पेरणीनंतर 25 दिवसांनंतर,जेव्हा पीक फुलोरा अवस्थेत असते तेव्हा व दाणे भरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. या अवस्थांमध्ये पिकाची गरज ओळखून व जमिनीचा प्रकार कोणता आहे
त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे. तसेच खत व्यवस्थापन करताना माती परीक्षण केले असेल तर उत्तम ठरते. माती परीक्षणानुसार एका एकरासाठी 25 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व दहा किलो पालाश द्यावे. पेरणी करताना नत्राची अर्धी व स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा द्यावी. पेरणीनंतर 20 दिवसांनी नत्राची उरलेली मात्रा द्यावी.
आंतर मशागत आहे महत्त्वाची
- पेरणी झाल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी लहान रोपांची विरळणी करून घ्यावी व हे विरळणी केलेले रोप पालेभाजी म्हणून विक्री करता येते.
- परंतु विरळणी केल्यानंतर लगेच हलकासा पाण्याचा पुरवठा करावा.
- एक-दोन वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून जमीन मोकळी व भुसभुशीत ठेवणे गरजेचे आहे.
- कोळपणी केल्यामुळे झाडाच्या बुंध्याजवळ मातीची भर लागते त्यामुळे पिक लोळत नाही.
राजगिऱ्याची काढणी व उत्पादन
पेरणी केल्यानंतर साधारण दहा 110 दिवसांनंतर हे पीक काढणीस येते. या तंत्राचा वापर केल्यास एकरी चार ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. चांगल्या उत्पादनासाठी उत्तम उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करणे गरजेचे आहे.
source : krishijagran