नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वेगवान प्रगती, अंदमान-निकोबार आणि श्रीलंकेत मॉन्सूनचे आगमन
23-05-2024
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वेगवान प्रगती, अंदमान-निकोबार आणि श्रीलंकेत मॉन्सूनचे आगमन
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २२) वेगाने वाटचाल करत अंदमान निकोबार बेटसमूहाच्या बहुतांशी भागात प्रगती केली आहे. तर अरबी समुद्रातून पुढे चाल करत श्रीलंकेचा जवळपास निम्मा भूभाग व्यापला आहे. उर्वरित अंदमान बेटांसह बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे.अंदमान-निकोबार बेटसमूह आणि मालदीवमध्ये रविवारी (ता. १९) मॉन्सूनचे आगमन झाले. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी (ता. २२) संपूर्ण निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान बेटांवरील माया बंदर पर्यंतच्या भागात मॉन्सून पोहोचला आहे.तर अरबी समुद्रातून प्रगती करत मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरिन समुद्राचा भाग आणि श्रीलंकेच्या निम्म्या भूभागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने अंदमान बेट समूहाच्या उर्वरित भागासह पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान, मॉन्सूनचे केरळमधील आगमनही लवकर होत ३१ पर्यंत भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होण्याची शक्यता आहे. वेगाने सुरू असलेली वाटचाल पाहता मॉन्सूनच्या केरळातील आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कमी दाब क्षेत्राची निर्मिती
नैॡत्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ईशान्य दिशेकडे सरकत असलेल्या प्रणालीचे उद्यापर्यंत (ता. २४) तीव्र कमी दाब क्षेत्रात (डिप्रेशन) रूपांतर होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.