सातबारा उतारा, जमिनीच्या हक्कांची नोंदणी व दुरूस्ती प्रक्रिया...
27-07-2024
सातबारा उतारा, जमिनीच्या हक्कांची नोंदणी व दुरूस्ती प्रक्रिया...
सातबारा उतारा म्हणजे थोडक्यात जमिनीचा आरसा. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज समजू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा नियम १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांविषयी विविध नोंदी ठेवल्या जातात.
त्यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तके असतात. त्यात कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. त्याबरोबर २१ वेगवेगळ्या प्रकारचे 'गावाचे नमुने' ठेवलेले असतात.
त्यापैकी 'गावाचा नमुना नं. ७' आणि 'गावाचा नमुना नं. १२' मिळून सातबारा उतारा हा तयार होतो. म्हणून त्याला सातबारा उतारा म्हणतात. प्रत्येक जमीनमालकास स्वत:कडे असलेली जमीन किती व कोणती हे या उतार्यावरून कळते.
सातबारा उतार्याच्या अगदी वर गाव, तालुका, जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते. ७/१२ हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक आणिअंतिम पुरावा असतो. ७/१२ ची नवीन पुस्तके साधारणतः १० वर्षांनी लिहिली जातात. ७/१२ पीक पाहणी नोंद दरवर्षी केली जाते.
राज्यात सुमारे अडीच कोटींहून जास्त सातबारा उतारे तयार आहेत. त्यामध्ये संगणकावर टायपिंग करताना किंवा पूर्वी हाताने लिहिताना चुका होण्याची शक्यता जास्त असते.
त्यातील चुका झाल्यास त्या दुरूस्त करता येणे शक्य आहे. चुका झालेले किंवा दुरूस्ती राहून गेलेले सातबारा उतारे दुरूस्ती करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले गेले आहेत.
सातबाऱ्यावर जर चुकीचे नाव आले असेल तर संबंधित तहसीलदाराकडे चूक दुरूस्तीसाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम १५५ प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसहित अर्ज करणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ:
- म्हणजेच खरे नाव काय आहे याचा पुरावा.
- तसेच ज्या सातबारावर दुरुस्ती करावयाची आहे तो मूळ सातबारा.
- तहसीलदारांनी काही अन्य कागदपत्रे मागितली असतील तर त्या सर्व कागदपत्रांसहित अर्ज करावा.
टीप:
तहसीलदार शहानिशा करून सातबारावरील नावामध्ये दुरूस्ती करतात. अशा प्रकारच्या दुरूस्तीसाठी वकिलांची गरज काही भासत नाही. तरीही महसूल विभाग किंवा अन्य कुठलेही सरकारी कार्यालयात वेळ लागण्याची शक्यता बऱ्याचदा अनेकदा अशी कामे वकिलांकडे सोपविली जातात.