सोयाबीन आवकेत घट
11-03-2024
सोयाबीन आवकेत घट
भारतातील सोयाबीन बाजार चालू हंगामात सुरवातीपासूनच शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. देशातील बाजारात ऑक्टोबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत सोयाबीन आवक कमी, गाळप कमी, सोयापेंड निर्मिती कमी आणि देशांतर्गत सोयापेंडचा वापर कमी मात्र सोयापेंड निर्यात गेल्या वर्षी याच काळातील निर्यातीपेक्षा जास्त राहिली, असा अंदाज सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे ‘सोपा’ने व्यक्त केला आहे.
‘सोपा’ने आपला मार्च महिन्याचा सोयाबीनचा अहवाल जाहीर केला. या अहवालात ‘सोपा’ने फेब्रुवारीच्या अखेरपर्यंतची बाजारातील आवक, सोयाबीन गाळप, सोयापेंड निर्मिती, सोयापेंड निर्यात आणि देशांतर्गत सोयापेंड वापराचा अंदाज मांडला. ‘सोपा’ने चालू हंगामातील देशातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज ११८ लाख टनांवर कायम ठेवला.
तर मागील हंगामातील शिल्लक साठा २४ लाख टनांवर असल्याचे म्हटले आहे. पेरणीसाठी बियाणे, थेट वापर आणि ११५ लाख टनांचे गाळप गृहित धरता पुढील हंगामासाठी १५ लाख टनांचा शिल्लक स्टॉक राहील, असेही ‘सोपा’ने आपल्या मार्च महिन्याच्या अहवालात म्हटले आहे.
सोयापेंडेचा विचार करता यंदा उत्पादन जवळपास ९१ लाख टनांवर होण्याचा अंदाज आहे. तर यंदाचा देशांतर्गत वापर ६८ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. यंदा देशांतर्गत वापर गेल्यावर्षीपेक्षा एक लाख टनाने वाढण्याचा अंदाज आहे. तर यंदा देशातून १४ लाख टन सोयापेंड निर्यात होऊ शकते, तर थेट वापर ८ लाख टन होऊ शकतो आणि थेट वापर ८ लाख टनांवर पोचेल, असाही अंदाज ‘सोपा’ने व्यक्त केला आहे.
देशातील बाजारात ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ७० लाख टन सोयाबीनची आवक झाली होती. यंदा ऑक्टोबर वगळता इतर चार महिन्यांमध्ये मासिक आवक गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहिली. फेब्रुवारीचा विचार करता ८ लाख टनांची आवक झाली होती. तर गेल्यावर्षी फेब्रुवारीत १० लाख टनांची आवक झाली होती. तर आयात १ लाख टनांची आयात झाली आहे.
सोयापेंड निर्मितीत तीन लाख टनाने घट:
चालू हंगामात फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ४१ लाख ४३ हजार टनांची सोयापेंड निर्मिती झाली. गेल्यावर्षीपेक्षा सोयापेंड निर्मिती जवळपास तीन लाख टनांनी कमी झाली. तर देशांतर्गत वापर सव्वा लाख टनांनी कमी होऊन २९ लाख टनांवर स्थिरावला आहे. तर मानवी वापरही एक लाख टनाने कमी होऊन पावणेचार लाख टनांवर स्थिरावला. निर्यात मात्र ४२ हजार टनांनी वाढून ९ लाख टनांवर पोचली आहे, असेही ‘सोपा’ने स्पष्ट केले आहे.