भाववाढीच्या अपेक्षेने मागील वर्षीचे सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरातच
26-05-2024
![भाववाढीच्या अपेक्षेने मागील वर्षीचे सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरातच](/_next/image?url=https%3A%2F%2Fstatic-img.krushikranti.com%2Fimages%2F1716716472476.webp&w=3840&q=75)
सोयाबीन बियाणाला ३५०० रुपये दर
भाव वाढतील या आशेने आजही ३० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवलेले आहे; पण भाव काही वाढेना. साडेचार ते पाच हजारांच्या पुढे भाव सरकेना. आता खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याला ३० किलो सोयाबीन बियाणाला ३५०० हजार रुपये मोजावे लागत आहेत. तुम्हीच सांगा शेतकऱ्याची प्रगती कशी होईल, असा सूर शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.
सोयाबीन पिकाचा उतारा बॅगला एकरी पाच ते सहा क्विंटल येतो. लागवड व इतर पूर्ण खर्च लावला तर शेतकऱ्यांना काहीच उरत नाही. एक तर पिकाचा उतारा कमी आणि उत्पादित मालाला भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे.
सोयाबीन पेरणीसाठी एकूण खर्च १७ हजार रुपये येतो आणि उत्पन्न मिळते २० हजार रुपये. शेतीमालाला भाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे.
शेतमालाला भाव मिळाला तरच प्रगती कधी पावसाचा अभाव, तर कधी अतिप्रमाण झाल्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातीच लागलेले नाही. अशा पेचप्रसंगात दुष्काळाचे गडद सावट शेतकऱ्यांसमोर उभे राहते. पिकली तर शेती, नाही तर जिवाची माती, अशी अवस्था शेतकऱ्यांची होते. शासनाने शेतमालाला चांगला भाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही.