Soybean Production : सोयाबीनचे एकरी उत्पादन धोक्यात.
18-10-2023
Soybean Production : सोयाबीनचे एकरी उत्पादन धोक्यात.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे महत्वाचे व हक्काचे नगदी पीक आहे. मात्र यंदा सोयाबीन पाऊस तसेच कीड-रोगांच्या विळख्यात सापडले आहे. त्याचा परिणाम आता उत्पादनावर झाला आहे. सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून सोयाबीनचे हाती आलेले एकरी उत्पादन निम्म्यावर आहे.
यंदा अनेक अडचणींमुळे उत्पादन ५० टक्के कमी झाले आहे. सोयाबीनला यंदा पावसाचा मोठा फटका आहे. अतिवृष्टीने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पुराने पीक खरडून गेले. त्यानंतर अतिपावसाने पीक पिवळे पडले. यातून शेतकऱ्यांनी पिकांना वाचविले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांचे आक्रमण झाले.
या पुढील रोगामुळे यलो मोझॅक, खोडकीड, मूळकुज यांचा सोायाबीनवर प्रादुर्भाव झाला. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचा परिणाम आता उत्पन्नावर होताना दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांना गेल्यावर्षी एकरी सरासरी दहा क्विटंलचे उत्पादन आले त्यांना यंदा केवळ एकरी पाच ते सहा क्विंटलच सोयाबीन झाले आहे.
हीच स्थिती संपूर्ण महाराष्ट्र्भर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होताना दिसत आहे. दारव्हा तालुक्यात सोयाबीन उत्पादनात घटीचे प्रमाणा जास्त आहे. हाती आलेल्या उत्पन्नाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना यंदा सुरुवातीलाच सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली.
एकीकडे भाव पडलेले असतानाच दुसरीकडे सोयाबीन सोंगणीच्या आणि काढणीच्या दरात वाढ झाली. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. सोयाबीनवर आलेल्या वेगवेगळ्या संकटामुळे यंदा सोयाबीन लागवडीचा खर्चही निघतो की नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे.