Dhananjay Munde : या योजनेमध्ये आता खतांनाही अनुदान.
23-09-2023
Dhananjay Munde : या योजनेमध्ये आता खतांनाही अनुदान.
फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन(Drip Irrigation) करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे ठिबक ऐवजी हे अनुदान खतांसाठी देण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला होता. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री मुंडे यांनी दिली.
माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर (Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme) यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या फळबाग लागवड योजनेंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत आता ठिबक सिंचनाऐवजी आवश्यक खतांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.
तसेच शेतकऱ्यांना इतर योजनांमधून ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ‘सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी आता ‘खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्याची तसेच सुधारित केलेल्या मापदंडांना मंजूरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत मंत्री मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती देखील दिली आहे.
राज्य सरकारने ६ जुलै, २०१८ रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिली. यामध्ये १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देण्यात येत होते. यामध्ये आता सुधारित मापदंड लागू करण्यात आले असून मजुरीसाठी देखील वाढीव खर्च देण्यात येणार आहे.
यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार असून, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
यावेळी मंत्री भुमरे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थींना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिताचे अनुदान केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय योजना प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेतून देण्यात येत होते.