बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विहिरी व शेततळ्यासाठी अनुदान...
06-09-2024
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विहिरी व शेततळ्यासाठी अनुदान...
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस ४ लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस १ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते.
इनवेल बोअरिंगसाठी आता ४० हजार तसेच यंत्रसामग्रीसाठी ५० हजार रुपये आणि परसबागेकरिता ५ हजार देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत १२ मिटर खोलींची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या १ लाख रुपये अनुदान देण्यात येते परंतु आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा २ लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल.
त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या २५ हजार रुपये देण्यात येते. तर आता तुषार सिंचन संच ४७ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.
या प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना ९७ हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. त्या शिवाय इतरही अनेक निकषांमध्ये सुद्धा आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.