Onion Market : उन्हाळी कांद्याचे भाव ५ हजारांवर.
29-10-2023
Onion Market : उन्हाळी कांद्याचे भाव ५ हजारांवर.
सध्या बाजारात सरासरीच्या तुलनेत आवक नसल्याची स्थिती आहे. त्यातच कांदा बियाणे उत्पादक कंपन्यांकडून बीजोत्पादनासाठी कांद्याची मागणी टिकून आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा साठा संपुष्टात आला आहे. अशा परिस्थितीत दरवर्षीच्या तुलनेत होणारी खरीप कांद्याची आवक अद्याप सुरू नाही. त्यामुळे पुरवठ्यावर दबाव असल्याने कांदा दरात वाढ झाली.
मागील वर्षीच्या रब्बी उन्हाळ कांदा हंगामात नाशिक जिल्ह्यात २ लाख २० हेक्टर क्षेत्रावर लागवडी झाल्या होत्या. मात्र वाढीच्या अवस्थेत रोगप्रादुर्भाव तर एप्रिल-मे महिन्यात काढणीच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे ३५ हजार हेक्टरवर जिल्ह्यात नुकसान झाले होते. त्यामुळे साठवणूक क्षमता यंदा अडचणीत आली. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांची कांद्याची साठवणूक केली; मात्र पुढे चाळीत सड झाली.
त्यातच साठवणूक होऊन ६ महिने झाल्याने साठवणूक क्षमता संपुष्टात आली. त्यामुळे जिल्ह्यात दैनंदिन आवकेच्या जवळपास ६० टप्प्यांपर्यंत आवक कमी झाली आहे. त्यात दसऱ्यानंतर सुरू होणारी खरीप लाल कांद्याची आवक तुरळक आहे. परिणामी, साठा संपुष्टात येऊन पुरवठा कमी होत आहे. सोमवार (ता. २२)पासून उन्हाळ कांद्याची आवक होत असल्याने दरात तेजी आली आहे. जिल्ह्यात क्विंटलला सरासरी ५,००० रुपयांपर्यंत दर गेला आहे
एप्रिल-मे महिन्यात काढणीच्या काळात झालेला पाऊस व गारपीट अडचणीची ठरली आहे. त्यामुळे जिवाणूजन्य सड होऊन साठवणूक क्षमतेवर परिणाम झाला. यात सटाणा, कळवण, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, नांदगांव, देवळा व निफाड तालुक्यांत नुकसान अधिक होते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एप्रिल ते जुलैदरम्यान अधिक प्रमाणात विक्री केली.
त्या वेळी उत्पादन खर्चाच्या खाली दर असल्याने कोट्यवधी रुपयांचा तोटा उत्पादन खर्चात सोसला आहे. मात्र आता ज्यांच्याकडे शेवटच्या टप्प्यात कांदा शिल्लक आहे, अशा थोड्याफार शेतकऱ्यांना दराचा लाभ होत आहे. मात्र दर वाढूनही फायदा शेतकऱ्यांचा होत नसल्याची स्थिती आहे.
दरवाढीची कारणे :-
- खरीप कांद्याची उपलब्धता कमी तर उन्हाळा कांद्याचा साठा अंतिम टप्प्यात.
- मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने पुरवठ्यावर ताण.
- महाराष्ट्रातील खरीप लाल पोळ कांद्याची आवक लांबणीवर.
- कांदा बियाणे उत्पादक कंपन्याकडून चांगल्या प्रतावरीच्या कांदा खरेदीला उठाव.
- गुजरात, मध्य प्रदेशमध्ये खरीप आवक होण्यास तीन आठवडे अवकाश.
- -दक्षिण भारतात पाऊसमान कमी असल्याने आंध्र व कर्नाटक राज्यात आगाप खरीप लागवडी तुलनेत कमी.