कांदा साठवणुकीसाठी आता नवीन तंत्रज्ञान विकसित, शेतकऱ्यांना होणार फायदा
17-01-2023
कांदा साठवणुकीसाठी आता नवीन तंत्रज्ञान विकसित, शेतकऱ्यांना होणार फायदा
कांदा हे व्यापारिदृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्वात जास्त केला जातो. कांदा पिकविणा-या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1.00 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते.
महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हे जिल्हे हेक्टरी कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्हयांमध्ये कांद्याची लागवड केली जाते.
नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील 37 टक्के तर भारतातील 10 टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्हयात घेतले जाते.
राज्यात रब्बी हंगामात प्रामुख्याने कांदा लागवड होते. पण कांदा या पिकासाठी शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या साठवणुकीची असते. या पिकाचे भाव पडलेले असो अथवा नसो त्यामध्ये देखील त्यांना या पिकाची साठवणूक करावी लागते.
नैसर्गिक कांदा चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान होत असते. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आता कांदा साठवणुकीसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
राजगुरुनगर (ता.खेड) येथील राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय आणि कला बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी दीर्घकाळ कांदा साठवणुकीसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज या आधुनिक संकल्पनेवर आधारित कंट्रोल्ड ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर हे नवीन तंत्रज्ञान पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर संयुक्तपणे विकसित केले आहे.
या पिकाच्या संचालनालयाच्या संशोधकांनी तीन वर्षे मेहनत घेऊन हे नवीन सर्वाना असे उपयुक्त तंत्रज्ञान विकसित केले आहे. संचालनालयाचे संचालक डॉ. मेजर सिंग आणि इतर काही संशोधक यांनी हे कंट्रोल्ड ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर तंत्रज्ञान विकसित केले आहे.
दोनशे टन क्षमतेचे स्टोरेज स्ट्रक्चर
हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तीन वर्षे चाचण्या घेण्यात आल्या त्यानंतर हे तंत्रज्ञान सिद्ध केले आहे. यासाठी चाकण येथील कला बायोटेक प्रा.ली या कंपनीच्या मदतीने दोनशे टन क्षमतेचे स्टोरेज स्ट्रक्चर तयार करण्यात आले. या स्टोरेजमध्ये नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याची साठवणूक केली.
कांद्याचे नुकसान नैसर्गिक कांदा चाळीमध्ये 40 ते 60 टक्क्यांपर्यंत आहे तेच यामध्ये 15 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे पुढील काळात कांद्याच्या साठवणीसाठी तयार झालेले कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
तसेच हे तंत्रज्ञान साठवण गृहातील तापमान व आर्द्रता नियंत्रित करून हवा खेळती राहण्यासाठी तयार केले आहे. यासाठी प्रतिकिलो प्रतिमहिना 60 पैसे खर्च येतो. हा खर्च लक्षात घेता, कंट्रोल्ड ओनीयन स्टोरेज स्ट्रक्चर हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे.
तसेच याचा अजून एक फायदा म्हणजे साठवलेल्या कांद्याच्या स्थितीची मोबाईलद्वारे माहिती घेता येते आणि नियंत्रणही ठेवता येते.
source : krushinama