Todays Rain Update : पावसाचा जोर कमी
14-06-2024
Todays Rain Update : पावसाचा जोर कमी
khandesh and vidharbh Monsoon Rain : खानदेश आणि विदर्भाच्या काही भागात मान्सून सरकत असताना उर्वरित भागातील पावसाचा प्रभाव कमी होत आहे.
खानदेश आणि विदर्भाच्या काही भागात मान्सून सरकत उर्वरित भागातील पावसाचा प्रभाव कमी होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अत्यंत कमी झाला आहे. सध्या तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली त्यामुळे खरिपाच्या कामांना वेग आला शेतीकामे करून घेण्यासाठी शिवारांत लगबग सुरू असल्याची स्थिती आहे.
last week update : गेले आठ दिवस राज्यातील विविध भागांत मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे भात खाचरे भरून वाहू लागली आहेत. काही ठिकाणी रोपवाटिकांच्या कामांना सुरवात झाली आहे. गुरुवारी (ता. १३) दिवसभर कोकणासह सर्वच भागात ढगाळ वातावरण राहिले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या. रत्नागिरीतील भांबेड येथे ८३, तर टेरव येथे ७९.३ मिलिमीटर पाऊस झाला.
maharashtra : मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. खानदेशात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. धुळे जिल्ह्यातील धुळे, खेड आणि कुसुंबा येथे ६२.८ मिलिमीटर पाऊस पडला. इतर भागात रिपरिप राहिली. मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर भागांत हलका, तर बारामती, सणसर येथे सर्वाधिक ८१ मिलिमीटर पाऊस पडला.
नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. या भागात मागील आठ दिवसांपासून पाऊस पडत असल्याने ओढे, नाले भरून वाहत आहेत. सोलापूर, सांगली जिल्ह्यांत पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे या भागात वाफसा स्थिती येत असल्याने शेतकऱ्यांची पेरण्या करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मराठवाड्यातही सर्वच भागात पावसाचा जोर कमी झाला आहे.
या भागात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पेरण्यांना सुरवात केली आहे. विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी दोन दिवसापासून पाऊस कोसळत आहे. परंतु आता या भागातील पाऊस कमी झाला आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला आहे. उर्वरित भागात अजूनही जोरदार पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्यांना काही प्रमाणात उशीर होत असल्याची स्थिती आहे.
गुरुवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस (मिमी) : स्रोत - कृषी विभाग.
कोकण : गोरेगाव ५०.८, लोणेरे ५०.८, मार्गताम्हाणे ५२.५, सावर्डे ६३.३, कळकवणे ६८.०, अबलोली ६०.०, आंगवली ५०.०, देवरुख ५५, आंबोली ५३.८.
मध्य महाराष्ट्र : मनमाड ५३, राशीन ५८.३, आश्वी ५५.५, पिंपरणे ५५.५, बारामती ८१, सणसर ८१, रावणगाव ५०, राजळे ६६, गगनबावडा ६०.०.
विदर्भ : वडशिंगी ३०, हिवरखेड ५०.५, अडगाव २५.८, महान ४०.५, गोवर्धन ४८.