Rain Update : राज्यातील या भागात आजही पावसाचा धोका कायम?
01-12-2023
Rain Update : राज्यातील या भागात आजही पावसाचा धोका कायम?
राज्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. बुधवारी (ता. 29) सायंकाळी कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.
आज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उत्तर अरबी समुद्र आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर सरासरी समुद्रसपाटीपासून 1.5 ते 3.1 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये हातकणंगलेमध्ये 40 मिमी, तासगावमध्ये 30 मिमी, सांगली आणि बारामतीमध्ये प्रत्येकी 20 मिमी, खुलताबादमध्ये 30 मिमी आणि गंगापूरमध्ये 20 मिमी पावसाची नोंद झाली.
पावसाला पोषक स्थिती असल्याने आज (ता.१) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, कमाल तापमानातील घट, किमान तापमानातील वाढ कायम आहे. गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे उच्चांकी ३१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर गडचिरोली येथे राज्यातील नीचांकी १५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
गुरुवारी (ता. 30) सकाळपर्यंत 24 तासांत नोंदलेले तापमान (°C मध्ये)
ठिकाण | कमाल तापमान | किमान तापमान |
---|---|---|
पुणे | ३०.३ | १८.६ |
धुळे | २८.० | १७.५ |
जळगाव | २६.४ | १८.५ |
कोल्हापूर | २९.६ | २१.७ |
महाबळेश्वर | २५.६ | १६.८ |
सोलापूर | ३०.६ | २२.० |
नाशिक | २८.५ | १७.७ |
निफाड | २८.५ | १८.४ |
सांगली | २९.८ | २०.९ |
सांताक्रूझ | ३१.० | १९.७ |
डहाणू | २८.९ | २०.० |
रत्नागिरी | ३३.० | २२.० |
छत्रपती संभाजीनगर | २८.६ | २०.२ |
नांदेड | २९.२ | २०.८ |
परभणी | २८.० | २०.८ |
अकोला | २५.५ | २०.५ |
अमरावती | २६.४ | १९.४ |
बुलढाणा | २६.४ | १९.४ |
ब्रह्मपूरी | ३०.५ | १८.६ |
चंद्रपूर | २९.० | १८.० |
गडचिरोली | ३०.२ | १५.४ |
गोंदिया | २८.० | १७.२ |
नागपूर | २७.२ | १८.४ |
वर्धा | २६.८ | १९.२ |
वाशीम | २४.२ | १८.२ |
यवतमाळ | २८.५ | १९.० |
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र
दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढली असून, गुरुवारी (ता. ३०) आग्नेय बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीचे रविवारपर्यंत (ता. ३) उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. सोमवारपर्यंत (ता. ४) ते उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह इशारा
नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ.